भाजपने राष्ट्रपतींचा अपमान केला आहे.महाराष्ट्राच्या राज्यपालांना त्वरित राष्ट्रपतींनी हटवावे.सत्तेच्या धुंदीत असलेल्या भाजपला आपण सत्तेच्या जोरावर काही करू शकतो असे वाटत होते पण महाराष्ट्रात त्यांना चांगला धडा मिळाला आहे.राज्यातील जनताही भाजपला चांगला धडा शिकवेल.कर्नाटकातील पोटनिवडणुकीत काँग्रेसला अधिक जागा मिळतील असे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी गोकाक येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कागवाड आणि अथणी येथे काँग्रेसचे उमेदवार नक्की निवडून येतील.गोककमध्ये देखील सतीश आणि लखन जारकीहोळी गेल्या अनेक महिन्यापासून कार्यरत आहेत.त्यामुळे गोकाकमध्येही काँग्रेसला वातावरण चांगले आहे असेही दिनेश गुंडूराव म्हणाले.
काँग्रेस दहा जागा जिंकेल-राजशेखर पाटील
आगामी पोटनिवडणुकीत काँग्रेसला पंधरा जागांपैकी आठ ते दहा जागांवर निश्चित विजय मिळेल असा आत्मविश्वास माजी मंत्री राजशेखर पाटील यांनी व्यक्त केला.बेळगाव येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.कागवाड येथे काँग्रेस उमेदवार राजू कागे यांच्या प्रचारासाठी ते आले होते.कागवाडमध्ये राजू कागे यांना जनतेचा उस्फुर्त पाठिंबा लाभत असून कागे तेथे विजयी होतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून अनेक योजना राबवलेल्या आहेत.जनतेसमोर काँग्रेसचे विधायक कार्य आहे.कागवाडचे श्रीमंत पाटील यांनी केवळ चौदा महिन्यात राजीनामा दिला.जनता त्यांना धडा शिकवेल असेही पाटील म्हणाले.
रमेश जारकीहोळी हे वरिष्ठ नेते आहेत.मंत्री असताना मी त्यांच्यासोबत काम केले आहे.त्यांनी असे का पाऊल उचलले हे समजत नाही असे राजशेखर पाटील एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.