कडोली भागात सध्या भात पीक जोमात आले असले तरी या पिकावर हुरा रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आता औषध फवारणीच्या कामात बंद केल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव शहरासह जिल्ह्यात महापुराचा फटका अनेकांना बसला आहे. पाऊस जाता जात नसल्याने अनेकांची पिके वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी मोठ्या चिंतेत असताना आता पुन्हा रोगाची लागण होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करू लागला आहे.
महापुरात ऊस, बटाटा, भुईमूग आदी पिके खराब झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही प्रमाणात भात पीक शिल्लक असले तरी त्याच्यावर ही आता रोगाची लागण होत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी करायचे तरी काय असा सवाल उपस्थित होत असतानाच सरकारने मात्र नुकसान भरपाई देण्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
कडोली भागात सध्या हूरा रोगाची लागण झाल्याने भात पीक खराब होत आहे. या रोगामुळे संपूर्ण भात पीक वाळून जात असून त्याच्यावर औषध फवारणी केल्यानंतर ही ते यशस्वी होत नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. हाता तोंडाला आलेले पीक वाया जात असल्याने शेतकरी चिंतातुर आहे. त्यामुळे झालेल्या भात पिकांच्या सर्वे करून निकाल भरपाई द्यावी अशी मागणी जोरदार होत आहे.