टाकाऊ मानवी केसांचा वापर करून नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी भाजीपाला पिकवला आहे.केसांचा वापर खत म्हणून करता येतो हे त्यांनी आपल्या प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे.खुशी अनगोळकर आणि रेमिनिक यादव अशी या केंद्रीय विद्यालयात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची नावे आहेत.
चार महिन्यांपूर्वी त्यांनी आयसीएमआर च्या राष्ट्रीय पारंपरिक औषध संस्थेमध्ये त्यांनी शास्त्रज्ञ डॉ.हर्षा यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू केले.त्यांना के एल ई च्या मत्तिकोप येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ श्रीदेवी अंगडी,प्रवीण यादहळ्ळी आणि शांतप्पा वरद या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
संशोधनानंतर त्यांच्या असे लक्षात आले की मानवी केसात झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आहेत.नंतर त्यांनी द्रव नैसर्गिक खत तयार केले.या द्रव नैसर्गिक खताचा वापर करून त्यांनी टोमॅटो, कॅबेज आणि मिरचीची लागवड केली.हा त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला.त्यानंतर त्यांनी लिंगराज कॉलेजच्या परिसरात पालकची लागवड केली.
या लागवड केलेल्या अर्ध्या भागात पारंपरिक खताचा वापर करण्यात आला आणि आणि अर्ध्या भागात केसांपासून तयार केलेल्या द्रव खताचा वापर करण्यात आला.नंतर पालकची वाढ पूर्ण झाल्यावर वजन करून पाहिले असता केसांपासून बनवलेल्या द्रव खताचा वापर केलेल्या भागात अधिक उत्पन्न मिळाले असल्याचे समजून आले.आता या विद्यार्थिनींची केंद्रीय विद्यालयाच्या राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.