Saturday, December 21, 2024

/

विनाप्रक्रिया 200 टन कचरा डंप

 belgaum

बेळगाव शहराचा विस्तार जस जसा वाढत आहे तसे कचऱ्याची समस्या देखील वाढतच आहे. यामुळे बेळगावात सध्यातरी दिवसागणिक 200 टन कचरा विनाप्रक्रिया डंप करण्यात येत आहे. त्यामुळे ही समस्या जटिल बनत असून विविध योजनांच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणारी घोषणा ही केवळ कागदावरच राहिली आहे. त्यामुळे सध्या तरी बेळगाव कचऱ्याच्या विळख्यात गुरफटत आहे.

शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी यासाठी वीजनिर्मितीसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यासाठी टेंडर मागविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र अजूनही याबद्दल कोणत्याच हालचाली नसून तब्बल चार ते पाच वर्षापासून या प्रकल्पाला कचऱ्यातच टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेळगावातील कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नसल्याने अनेक प्रकल्प रेंगाळत पडलेले आहेत. कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनविण्याचा आरोप करण्यात येत आहे.

वीज निर्मिती प्रकल्पासाठी काही शहरांना येथील नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. तातडीने हा प्रकल्प सुरू करू असे आश्वासन देखील त्या वेळेला देण्यात आले. मात्र केवळ सहलीसाठी त्यांची ही भेट असल्याचे दिसून आले. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बेळगाव शहराचा विकास सुरू आहे. मात्र कचऱ्यासाठी योग्य ते प्रक्रिया करण्यावर महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम शहरातील गल्लीबोळात दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे तरी कचऱ्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे.

शहरात रोज सुमारे 200 टन कचरा जमा होतो. त्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज होती. यासाठी काही ठेकेदारांना ठेका देऊन त्याची जबाबदारी देण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. अजून एकही कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत नसल्याने तो कचरा तसाच करण्यात येत आहे. तुरमुरी येथील कचरा डेपो मोठ्या प्रमाणात कचरा ठेवण्यात येत असला तरी त्याच्यावर प्रक्रिया सुरू करण्यात आली तर ती यशस्वी होईल यात शंका नाही. मात्र महानगरपालिकेने काही अंशपूर्ति ही प्रक्रिया राबवली त्यानंतर पुन्हा धूळखात पडला आहे. त्यामुळे यापुढे तरी अशा प्रकल्पांवर गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांचा जीव वाचवावा अशीच मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.