बेळगावच्या दोन तरुणींची सैन्य दलात महिला आर्मी पोलीस म्हणून निवड झाली आहे.या निवडीवरून बेळगावच्या तरुणी देखील सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून समस्त बेळगावकर जनतेसाठी ही अभिमानाची बाब आहे.
बेळगावात ऑगस्ट महिन्यात देशातील पहिल्या महिला सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या भरती प्रक्रियेत आपली शारीरिक आणि बौद्धिक क्षमता सिद्ध करून या दोन तरुणींनी आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले आहे. महिला आर्मी पोलीस भर्ती प्रक्रियेत भडकल गल्ली येथील स्मिता मारुती पाटील तर वाघवडे येथील शेतकरी कुटुंबातील राघवेणी पाटील या दोघींची निवड झाली आहे.
देशभरात पाच ठिकाणी महिला आर्मी पोलीस दलाची भर्ती प्रक्रिया पार पडली होती देशभरातून साडे आठ लाख मुलींनी ऑनलाईन अर्ज केला होता .त्यातून 100 मुलींची निवड करण्यात आली आहे. बेळगावातील मराठा सेंटर मध्ये शारीरिक चाचणी पार पडली होती. कर्नाटकातुन आठ जणींची निवड झाली असून त्यामध्ये बेळगावच्या या दोन तरुणींचा समावेश आहे.
कुटुंबातील वारसा जपलाय
भडकल गल्लीत राहणाऱ्या स्मिता मारुती पाटील या 19 वर्षीय मुलीने क्लब रोड वरील एस जी आर्मी ट्रेनिंग सेंटर मध्ये चार वर्षा पासून प्रशिक्षण घेत होती. चार वर्षापूर्वी वडिल अपघातात जखमी झाले असून घरची परिस्थिती गंभीर आहे. तिचे वडील मारुती पाटील टी ए बटालियन मध्ये निवृत्त झालेत. आईचे नाव जयश्री असून तिला दोन बहिणी एक भाऊ आहेत. आजोबा आजोबांचे भाऊ ,आईचे वडील देखील सैन्यात सेवा बजावत होते.
शेतकरी कुटुंब आर्मीत.. आईचे स्वप्न केलं पूर्ण
वाघवडे येथील राघवेणी पाटील ही शेतकरी कुटुंबातील आहे . वडिलांचे नाव रघुनाथ पाटील आणि आईचे नाव मंगला पाटील आहे.आईची इच्छा होती की आपल्या मुलीने सैन्यात जावे,तिची इच्छा आणि स्वप्न लेकीने पूर्ण केले आहे. सेन्ट जोसेफ शाळेत शिक्षण तिचे शिक्षण झाले असून गोगटे कॉलेज ऑफ कोंमर्स मध्ये ती बी कॉम च्या अंतिम वर्षात शिकत आहे.तिला तीन बहिणी एक भाऊ असून सर्वात मोठी राघवेणी आहे.
कठोर परिश्रम घेऊन मुलगी सैन्यात दाखल झाली याचा अभिमान वाटतो. आमचं नाव तिने उज्वल केलंय.माझे स्वप्न मुलीने पूर्ण केलंय याचा मला अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया आई मंगल पाटील यांनी व्यक्त केले.