महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असला तरी या दोन्ही राज्यांना जोडणारा रस्ता देखील तसाच दयनीय अवस्थेत पडून राहिला आहे. हांदिगणुर येथून कुदनुर तालुका चंदगड मार्गे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्रात जाण्यासाठी हा रस्ता कडोली, केदनूर, मंनिकेरी, गुंजनहट्टी, देवगिरी यासह इतर गावांना नजीकच्या आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना येथून प्रवास करणे मुश्कील बनले आहे. मागील काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र हद्दीपर्यंत हा रस्ता करण्यात आला होता. मात्र कर्नाटकाने याकडे दुर्लक्ष करून केवळ एक ते दीड किलोमीटरचा रस्ता तसाच ठेवल्याने त्रास होत आहे.
या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे बनत आहे काही छोटेमोठे अपघात ह्या रस्त्यावर दररोज घडत असतात. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार आपापल्या हद्दीपर्यंत रस्ता केल्यास अनेकांना ते सोयीचे ठरणार आहे. हा रस्ता करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
कर्नाटक हद्दीपर्यंत उद्योग खात्रीतून या रस्त्याचे काम करण्यात आले होते. हांदिगणुर ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणारा हा रस्ता डागडुजी केल्यामुळे काही प्रमाणात बरा झाला होता. मात्र आता पुन्हा या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. तसेच महाराष्ट्रा पासून सुरु होणाऱ्या रस्ता देखील खराब झाला असून या रस्त्याची डागडुजी करण्याकडे भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकाला जोडणारा दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी होत आहे.