एक ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. आर्थिक परिस्थिती, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे मानवाची वयोमर्यादा वाढली आहे, त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे. पण वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे. या समस्यांचेही अनेक पैलू आहेत. आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा स्वरूपाच्या या समस्या असतात. वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात अशातून मार्गक्रमण करताना जेष्ठांची बरीच दमछाक होते. त्यातच मुलं नसतील तर वेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं अशा व्यक्तींच्या मदतीला शांताई सारखा वृद्धाश्रम धावून जातो. गेल्या अनेक वर्षांपासून इथे अनेक जेष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत त्यांच्या आयुष्यात आनंद मिळावा त्यांना आम्हास मुलं नाहीत याच दुःख होऊ नये म्हणूनच आज या दिनी आम्ही त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे असे विचार जायंट्स मेनचे अध्यक्ष सुनिल भोसले यांनी व्यक्त केले.
जायंट्स मेनच्या वतीने आयोजित गप्पाटप्पा या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
मदन बामणे यांनी प्रास्तविकात जायंट्स मेनची माहिती देऊन
न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा।
वृद्धा न ते ये न वदान्ति धर्मम्।।
म्हणजेचज्या सभेत वृद्ध, अनुभवी लोक नसतील ती सभा नव्हे. जे धर्म सांगत नाहीत ते वृद्धच नव्हेत.अशा प्रकारे महाभारतात वृद्धांचा गौरव केलेला आहे. तोच वारसा आपण पुढे चालवला पाहिजे. वृद्धाश्रम हा ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येवरील शेवटचा उपाय समजला जावा असे सांगितले.
जवळजवळ तीन तास या आज्जी आजोबांच्या सोबत गप्पागोष्टी करून त्यांना बोलतं करण्यात आले, जायंट्स मेनच्या सदस्यांनी आजी आजोबांना आरती करून नतमस्तक झाले नंतर अनेक आज्जी आजोबांनी छान छान गाणी म्हंटली, शेवटी झिंगाट च्या गाण्यावर सगळ्यांनीच मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला एकूणच वृद्धाश्रमात कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते.
शांताई चे संचालक विजय मोरे यानी आम्ही रोजच जेष्ठ नागरिक दिन साजरा करत असतो कारण गेल्या वर्षांपासून विजय पाटील यांच्या मातोश्रीच्या नावाने शांताई वृद्धाश्रमाची स्थापना केली त्यादिवसापासून रोज त्यांच्यासोबतच असतो. तुमच्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून हा आश्रम चालू असून आज तुम्ही इथे येऊन इथल्या आजी आजोबांना आनंद देण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी नागेश पाटील, व्यवस्थापक नागेश चौगुले,संतोष ममदापूर , महंमद कुणिभावी, संजय पाटील, लक्ष्मण शिंदे, सुनिल चौगुले,राहुल बेलवलकर, भरत गावडे, सुनिल पवार उपस्थित होते.