पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सध्या राज्याकडे असलेल्या निधीचा वापर केला जाणार आहे.विकासकामांचा निधी पुराग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येत आहे.पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस.येडियुरप्पा यांनी बेळगावच्या सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली.
केंद्राचे गृहमंत्री,अर्थमंत्री आणि केंद्रीय पथकाने देखील पूरग्रस्त भागाची पाहणी करून महिना लोटला आहे पण केंद्राने अद्याप मदत दिली नाही.परवाच बेंगलोर येथे इस्रोला भेट देण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील येडीयुरप्पा यांना केंद्राच्या मदतीबाबत बोलता आले नाही.
केंद्राकडून देखील मदत मिळेल असे आश्वासन येडीयुरप्पा यांनी दिले.राज्यात एक लाख दहा हजार कुटुंबाना पुराचा फटका बसला आहे.पुराचा फटका बसलेल्या कुटुंबाना दहा हजार रु ची मदत त्वरित देण्यात येत आहे.ज्यांचे संपूर्ण घर पडले आहे अशा कुटुंबाना घर बांधण्यासाठी पाच लाख रु ची मदत दिली जाणार आहे.त्यापैकी एक लाख रु त्वरित घर बांधकाम सुरू करण्यासाठी देण्यात येतील.ज्यांच्या घरांची पडझड झाले अशा कुटुंबाना पन्नास हजार रु मदत देण्यात येईल असेही मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सांगितले.