पूरग्रस्त भागातील जनतेला अद्याप निवारा केंद्रात आसरा घ्यावा लागला असून तेथे अनेक समस्यांचा जनतेला सामना करावा लागत आहे.रामदुर्ग तालुक्यातील सुरेबान येथील निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या मुल्ला कुटुंबियांवर त्यांचा चार वर्षाचा मुलगा ताप येऊन मृत झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुल्ला कुटुंबिय हे हिरे हंपीहोळी गावातील असून पुरामुळे त्यांनी सुरेबान येथील निवारा केंद्रात आश्रय घेतला आहे.सुरेबान येथील एपीएमसी गोडाऊनमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.या गोडाऊनमध्ये डासांनी उच्छाद मांडल्यामुळे जनतेला त्रास होत आहे.मुल्ला यांच्या अब्दुलसाब या चार वर्षाच्या मुलाला डास चावल्यामुळे ताप आला होता.
त्याच्यावर प्राथमिक उपचार केंद्रात उपचार केले होते .पण तरीही ताप कमी झाला नाही.तापाचा जोर वाढल्यामुळे त्याला उपचारासाठी तालुक्याच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आपल्या दौऱ्या दरम्यान मुल्ला कुटुंबियांची भेट घेऊन पाच लाखाचा धनादेश सुपूर्द केला.जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.