शहर पोलिसांनी जुलै महिन्यात 575 नो पार्किंगचे गुन्हे दाखल करून 944550 रु दंड वसूल केला आहे.शहर पोलिसांनी शहरातील अनेक रस्त्यावर नो पार्किंग झोन जाहीर केला आहे.पण हे जाहीर करताना त्यांनी फलक कोठेच लावले नाहीत.
बेळगावला गोवा आणि कोल्हापूर भागातून लोक खरेदी आणि अन्य कामासाठी येतात.त्यांना फलक नसल्यामुळे येथे वाहन पार्क करायचे नाही हे समजत नाही.त्यामुळे ते वाहन लावून गेले की त्याचे वाहन टो करून नेले जात आहे.आपली कामे आटपून आल्यावर वाहन जागेवर नाही हे त्यांच्या ध्यानात येते.नंतर चौकशी केल्यावर त्यांना समजते की त्यांचे वाहन पोलिसांनी टो करून नेले आहे.
पोलिसांनी प्रथम नो पार्किंगचे फलक लावावेत आणि नंतर वाहने उचलून न्यावीत.नो पार्किंग बोर्ड नसल्यामुळे आम्हाला येथे वाहन पार्क करायचे नाही हे समजत नाही.नो पार्किंग बोर्ड असेल तर कोणी तेथे वाहन पार्क करणार नाही अशी प्रतिक्रिया परगावचे आणि स्थानिक वाहन मालक व्यक्त करत आहेत.
फलक लावा आणि मग वाहने टो करून न्या आणि दंड वसूल करा हे पोलिसांना सांगण्याची गरज आहे.पोलीस आयुक्तांनी याचा विचार करून नो पार्किंग बोर्ड त्वरित लावावेत अशी मागणी होत आहे.