त्यांच्या माहेरी येळ्ळूर गावात मंगाई तलावातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होऊन घरात काही फूट पाणी शिरले आहे.त्याची पाहणी करण्यास त्या सकाळी येळ्ळूरला जाणार होत्या पण मतदार संघातील गावात पूर आल्याचे समजताच आधी लगीन कोंडण्याचे मग रायबाचे या उक्तीनुसार मतदार संघातील जनतेला मदत करण्यासाठी त्या गेल्या.संपूर्ण दिवस त्यांनी मतदार संघातील गावाची पाहणी करून नुकसान झालेल्या कुटुंबाना धीर दिला.
जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी आपल्या मतदार संघातील गावात उदभवलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना केली.त्यांच्या समवेत बेळगावच्या तहसीलदार मंजुळा नाईक होत्या.
पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांशी पहाटे संपर्क साधून त्यांनी पूर स्थिती उदभवलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक बंद करून कोणतीही जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केल्या.
मन्नूर,अलतगा,कंग्राळी, चिरमुरी ,उचगाव आणि अन्य गावात सरकारी अधिकाऱ्यांसह भेट देऊन झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन तहसीलदाराना नुकसान झालेल्यांना त्वरित मदत आणि भरपाई देण्याची सूचना केली.यावर तहसीलदार मंजुळा नाईक यांनी मन्नूर येथे घर पडलेल्या दोन कुटुंबाना त्वरित पन्नास हजार रु मदत देणार असल्याचे सांगितले.उचगाव येथे वेंगुर्ला रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून पंप लावून पाणी काढण्यात आले.सरकारी अधिकाऱ्यांना पूरग्रस्त भागात विशेष लक्ष देण्याची सूचना सरस्वती पाटील यांनी केली.
पूर स्थिती उदभवलेल्या गावात आता बोटी पाठविण्यात येणार आहे त्यातील बोटी उचगावं जिल्हा पंचायत मतदार संघात द्या अशीही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.यावेळी तहसीलदार मंजुळा नाईक अन्य अधिकारी देखील उपस्थित होते.