सलग पडत असलेल्या पावसाने बेळगाव शहर आणि परिसरात पूर परिस्थिती निर्माण केली आहे. रस्त्यांवर, घरात, बेसमेंटमध्ये, शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. एक प्रकारे ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. सध्या सगळीकडे पाणी वाढत असून रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी रात्रीच्या संततधार पावसाने आर के मार्ग पहिला क्रॉस हिंदवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हिंदवाडी भाग उंचीवर आहे तरी देखील पाणी घुसले आहे. आणखी पाणी वाढल्यास ते घरा घरात शिरू शकते.
बेनकनहळळी रोड वर रात्री प्रवास करू नये , अशी धोक्याची सूचना आली आहे.बेनकनहळळी येथील केम्बळी नाला ओव्हर फ्लो झाला आहे. कुणीही वाहतूक करू नये कारण नाल्या पासून 1 की मी गावापर्यंत पाणी भरलं आहे, यामुळे गावातील लोक बाहेर पडू शकत नाहीत आणि बाहेरील लोक गावात येऊ शकत नाहीत अशी अवस्था आहे.
शास्त्री नगर गुडस शेड रोड परिसरात नागरिकांचे हाल सुरू आहेत. नाल्यातील पाणी घरात घुसले असून स्वतःचा बचाव करावा की घरातील वस्तू सांभाळायच्या अशी अवस्था झाली आहे.जुना पी बी रोड म्हणजे आताच्या बी एस येडीयुरापा रोडवर देखील ड्रीनेजचे पाणी साचलेले आहे त्यामुळे हा रस्ता देखील तलावा प्रमाणे दिसत आहे
बेळगाव खानापूर रोडवर nh4 अ वर पाणी वाढत आहे. पिरनवाडी वाडी येथील लक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ पाणी आले असून या मार्गावरून रात्रीची वाहतूक करणे धोक्याचे ठरू शकते.
मराठा कॉलनीत मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साठले आहे. तेथील रहिवाशांना रस्त्याच्या डिव्हायडर वरून चालत जावे लागत आहे.रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.मराठा कॉलनीतला मुख्य रस्ता पाण्याने भरला आहे.
शहराभोवतालाची सर्व शेतशिवारे भरून गेली असून त्यामध्ये पेरलेली पिके धोक्यात आली आहेत. शेतांना नदी चे स्वरूप आले आहे. असाच पाऊस पडत राहिल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे.