24 तास सत्ता आणि राजकारणाच्या नजरेतून समितीच्या संघटनेकडे बघण्याची काहीजणांची प्रवृत्ती वाढली आहे. खुर्चीसाठी संघटनेचा वापर करणाऱ्या संकुचित वृत्तीला बाजूला सारून सर्वसामान्य मराठी भाषिकांचे हक्क व हित संरक्षण करण्यासाठी आगामी काळात लोकाभिमुख आंदोलने हाती घेण्यात येतील. अशी माहिती खानापूर तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी दिली.
स्वार्थ सोडून सीमाप्रश्नाची सुटका या अंतिम ध्येयासाठी समितीसोबत येणाऱ्यांना म. ए. समितीचे दरवाजे 24 तास उघडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमवारी दुपारी दोन वाजता येथील शिवस्मारकात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील होते.
तालुक्यातील प्रलंबित समस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. प्रामुख्याने ग्रामीण भागातील व बेळगाव खानापूर मार्गावरील बस वाहतूकीची समस्या, आधार कार्ड केंद्रांवर होणारी जनतेची कुचंबणा, मराठी शाळांकडे शासनाचे होणारे दुर्लक्ष, शाळांची दुरुस्ती व शिक्षकांची पूर्तता आदी विषयांवर आगामी काळात आंदोलन हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत अध्यक्ष तसेच माजी आमदार कै.श्री वसंतराव पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी जुन्या-जाणत्या अनेक ज्येष्ठ मंडळींनी त्यांच्या सीमाप्रश्न दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. तसेच आगामी काळात महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना बळकट करण्यासाठी रूपरेषा आखण्यात आली. तसेच सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकरात लवकर करून घेण्यासाठी येत्या काही दिवसात खानापूर तालुक्यातील एक शिष्टमंडळ शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी नेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी अनेकांनी आपले विचार मांडले. भविष्यकाळात महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना बळकट व्हायची असेल तर ज्यांनी ज्यांनी समितीच्या नावावर खुर्च्या भोगल्या आहेत. पदे भोगली आहेत. त्यांनी आपला वैयक्तिक स्वार्थ आणि महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे. व मराठी भाषिक जनतेच्या भल्यासाठी एकत्र यावे. व जनकल्याणार्थ कार्य करावे. या भावनेने समितीमध्ये येणाऱ्यांचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे दरवाजे सदैव खुलेच आहेत. असे विचार अनेक जुन्या जाणत्या मंडळींनी मांडले.
प्रारंभी खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक चिटणीस बाबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी प्रकाश चव्हाण, विवेक गिरी, अविनाश पाटील, मुरलीधर पाटील, विशाल पाटील, प्रवीण पाटील, शंकरराव पाटील, जयराम देसाई, पुंडलिकराव चव्हाण, नारायण लाड, महादेव घाडी, तातोबा पाटील, अमृत पाटील, कृष्णा मन्नोळकर, शंकर पाटील, विठ्ठल गुरव आदी उपस्थित होते.