दडपशाही करून सुपीक जमिनीत उभारण्यात येणारा सांडपाणी प्रकल्प रद्द करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हलगा येथील सुवर्णसौध या विधिमंडळाच्या गेटसमोर सकाळपासून धरणे आंदोलन छेडले.सांडपाणी प्रकल्पासाठी पोलीस बंदोबस्त लावून सुपीक जमीन प्रशासनाने संपादित केली आहे.काही कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन फक्त जमीनच होती.त्यामुळे या कुटुंबासमोर उर्वरित आयुष्य कसे काढायचे हा प्रश्न आ वासून समोर ठाकला आहे.
सकाळी धरणे धरल्यावर निवासी जिल्हाधिकारी बुधेप्पा आणि तहसीलदार मंजुळा नाईक यांनी जिल्हाधिकारी तुम्हाला गुरुवारी भेटतील असे आश्वासन दिले पण शेतकरी मात्र त्यांचे काही म्हणणे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.जिल्हाधिकारी भेटायला पाहिजेत असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला .दुपारी आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच पंगत करून जेवण केले.जोपर्यंत सांडपाणी प्रकल्प हलवला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
यापूर्वी देखील सुवर्णसौध इमारत बांधण्यासाठी देखील हलगा गावची जमीन घेताना ज्यांची जमीन घेतली जाईल त्याला नोकरी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.पण आजतागायत कोणालाही नोकरी देण्यात आली नाही.प्रत्येकवेळी जमीन संपादन करताना हलगा गावच का टार्गेट केले जाते असा सवाल बळीराजा करत आहे.