मुसलमान धर्मियांचा सण रमजान तोंडावर आला आहे. आमावस्येनंतर चंद्र दर्शन झाले की रमजान सणाचा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. येत्या एक दोन दिवसात हा सण साजरा करण्याची संधी येणार असल्याने मुसलमान बांधवांनी याची तयारी सुरू केली आहे.
एक महिनाभर कडक रोजे करून हा सण 30 दिवसांनी मुसलमान बांधव साजरा करतात. या रोज्यांच्या काळात पावित्र्य जपण्यात येते. सूर्योदयापूर्वी भोजन करून रोजा हा कडक उपवास सुरू करून सूर्यास्तानंतर हा उपवास सोडला जातो. याकाळात मशिदी, दर्गे आणि मदरष्यांमध्ये धार्मिक प्रार्थना केल्या जातात. या कालावधीत गोर गरिबांना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जातो.
रमजान सण साजरा करताना मिष्टान्न आणि शाकाहारी व मांसाहारी पदार्थांवर भर देण्यात येतो. यादिवशी आपल्या सर्व धर्मीय मित्र मंडळींना बोलावून त्यांना जेवू घालण्याची पद्धत आहे यातून सामाजिक सलोखा व मित्रत्व जपण्याचा प्रयत्नही केला जातो.
रमजान च्या सणात नवीन कपडे घालून उत्साह साजरा केला जातो.
चंद्र दिसल्यानंतर धार्मिक प्रमुख सण साजरा करण्याचे फर्मान काढतात, हे फर्मान निघालेल्या रात्री पासूनच सण साजरा करण्यास सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सामूहिक प्रार्थना केली जाते व एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. सध्या सणांच्या तयारीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी असून मुसलमान बांधव तयारी करत आहेत.