बेळगावात न्यु गांधी नगर जवळ रेल्वे ट्रॅकवर माय लेकराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली आहे . पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने दोन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, बारा वर्षाची मुलगीने आईच्या हाताला हिसडा मारून पळून गेल्याने ती वाचली आहे.घटनास्थळावरून पतीही फरारी झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला आहे.रेणुका यल्लाप्पा गुटगुद्दी (वय 35) व लक्ष्मण वय (वय ७) अशी मृतांची नावे आहेत, तर सविता ही बारा वर्षाची मुलगी पळून गेल्याने वाचली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुटगुद्दी कुटुंब मूळचे हुक्केरी तालुक्यातील करगुप्पी येथील आहे. भाजीपाला विकून जगण्यासाठी काही वर्षांपासून पती-पत्नी व त्यांची दोन मुले गांधीनगर जवळील मारुतीनगर परिसरात पत्रेवजा शेडमध्ये राहतात. या पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडण होत असल्याचे शेजारी सांगतात. मंगळवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते अशी माहिती मिळाली आहे.
काल रात्रीच्या भांडणा नंतर मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी रेणुकाने बारा वर्षाची मुलगी सविता व सात वर्षाच्या लक्ष्मणला हाताला धरून ओढत रेल्वे ट्रॅकजवळ आणले. त्यांच्या राहत्या शेडपासून पासून ट्रॅक अवघ्या शंभर मीटरवर आहे. रेणुका मुलगा व मुलीला घेऊन ट्रॅकजवळ आली तेव्हा सविताने आईच्या हाताला हिसडा मारून पळ काढला. यानंतर मायलेक ट्रॅकवर झोपल्याचा संशय आहे. रेल्वे अंगावरून गेल्याने पत्नीचा एक पाय तुटला असून तो घटनास्थळावरून गायब आहे. मध्यरात्री घडलेल्या घटनेनंतर तो भटक्या कुत्र्यांनी पळवल्याचा संशय आहे. मुलाचे शिर धडा वेगळे झाले असून ते ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला पडले होते. पहाटे पाचच्या सुमारास यल्लप्पाने फोन करून गावीही याबाबत कल्पना दिली. परंतु घटनेनंतर तो फरारी झाल्याने त्यानेच पत्नी व मुलाचा घातपात केल्याचा संशय व्यक्त होत होता.
माहिती मिळताच माळमारुती ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश हंचनाळ, रेल्वेचे उपनिरीक्षक बीटी वालीकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेनंतर मृत महिलेचे नातेवाईक व शेजाऱ्यांनी यल्लाप्पा हा पत्नीला व मुलांना सतत मारत असल्याचे सांगितले. यावरून यल्लाप्पानेच घातपात केल्याचा संशय व्यक्त होत होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत