बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला , काही भागात चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून जर येत्या आठवड्याभरात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या नाही तर याचे गंभीर परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. एकीकडे पाणी समस्या तर दुसरीकडे चारा समस्या अशी स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील इतर भागाच्या तुलनेत बेळगाव तालुक्या बरोबरच जिल्ह्यातही चाऱ्याची समस्या आणि चारा छावण्या कमी असल्याने याचा फटका शेतकर्यांना बसत आहे. गेल्या काही वर्षापासून सातत्याने सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होत असल्याने पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. परिणामी नागरिकांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी गावात शेकडो टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याचबरोबर जनावरांचाही विचार करून चारा पुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्ह्यात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जर मध्यंतरी हा पाऊस जोरदार बरसला असता तर चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असता. मात्र तसे झाले नाही. त्यामुळेच आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दुष्काळी परिस्थितीत हे आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करणाऱ्या जनावरांचे करायचे काय हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित होत आहे.
काही चारा छावण्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू असून त्यांना प्रशासनाकडून निधी देण्यात येत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनाचा चारा-पाण्याची जबाबदारी शासनाने घेतली असली तरी अजूनही जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोरदार होत आहे