बेळगावपासून ७ किलोमीटरवरील हलगा-बस्तवाड येथील लक्ष्मी यात्रेत लक्ष्मीच्या गदगेजवळ लाल पिवळा ध्वज लावण्यावरून दोन गटात तणाव निर्माण झाला. यावेळी दोन्ही गटांमध्ये दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सौम्य लाठीमार करत गर्दीला पांगवले.
हलगा-बस्तवाड येथील यात्रेला प्रारंभ झाला आहे. येथे पूर्वीपासून मराठी-कन्नड भाषिक तरुणांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद होतो. लक्ष्मी गदगेवर बसली असून त्याच्या बाजूला कन्नड गटाने लालपिवळा ध्वज लावला आहे. त्यामुळे मराठी भाषिक तरुणांनीही येथे भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला.
यातून दोन्ही गटात तणाव निर्माण होऊन दगडफेक सुरू झाली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत तरुणांना पांगवले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने येथील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.