बेळगाव शिवजयंती उत्सवाचे शताब्दी वर्ष, सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरे करण्यात येणार असून 8 रोजी बेळगाव शहरा सोबत शहापूर येथील चित्ररथ मिरवणूक देखील काढण्याचा निर्णय शहापूर शिव जयंती मंडळांच्या बैठकीत घेण्यात आला.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्यावतीने आज रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी नेताजी जाधव होते. बैठकीत यावर्षी सहा ते आठ मे दरम्यान बेळगावात पारंपारिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी बेळगावचा शिवजयंती उत्सव शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे.त्यामुळे या वर्षीचा उत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात यावा शहापूर विभागात शिवजयंतीनिमित्त पोवाडे व्याख्यान आधी कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मंगळवार दिनांक 30 रोजी सकाळी 11 वाजता महा पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये चित्ररथ पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी शिवाजी उद्यान तसेच नाथ पै चौक येथे प्रेक्षक गॅलरी उभारणी करण्यात यावी. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत. बंद पडलेले पथदिवे सुरू करण्यात यावेत. रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडण्यात याव्यात.अग्निशामक दल,रुग्णवाहिका व्यवस्था करण्यात यावी. याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. निवेदनांची पूर्तता न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.
सहा मे रोजी शिव जयंती उत्सवास सुरुवात होणार असून असून सात रोजी वडगांव येथील चित्ररथ तर 8 रोजी शहापुरचे चित्ररथ परंपरे प्रमाणे संभाजी चौकातून शहरातील मुख्य मिरवणूकीत सहभागी होतील अशी माहिती नेताजी जाधव यांनी दिली.
बैठकीतील राजू पाटील, एस. आर. चौगुले, रणजीत हावळानाचे, ज्ञानेश मननुरकर, तानाजी शिंदे नितीन जाधव यांनी विचार मांडले महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहापूर विभागातील विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीला बहुसंख्येने उपस्थित होते.