बेळगाव मतदारसंघाचे निरीक्षक राजीव चंद्र दुबे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विशाल आर. यांनी सोमवारी मतमोजणी केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. हे केंद्र स्थापन करण्यात येत असलेल्या आरपीडी महाविद्यालयाला त्यांनी भेट दिली.
मतमोजणी खोल्या आणि मतयंत्रे ठेवावयाची स्ट्रॉंगरूम निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तयार करावी, अशी सूचना त्यांनी निवडणूक अधिकार्यांना केली.
बेळगाव मतदारसंघाच्या व्याप्तीत येणार्या आठ विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणी खोल्या आणि स्ट्रॉंग रुम निर्माणच्या कामाची त्यांनी पाहणी केली. मतमोजणी दिवशी सुरक्षेसह अन्य कोणतीही अडचण येऊ नये, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.
यावेळी मतपत्रिकांचा उपयोग केला जाणार असल्याने त्यानुसार आवश्यक त्या खोल्या तयार ठेवाव्या लागणार असल्याचे आर. विशाल यांनी दुबे यांना सांगितले.
मतयंत्रे, व्हीव्हीपॅट आणि बॅलेट युनिटसाठी प्रायोगिकरित्या स्ट्रॉंगरुम कशी असावी, याची दुबे व डॉ. विशाल यांनी पाहणी केली. मतमोजणी काऊंटर, बॅरिकेडची व्यवस्था आणि मतमोजणीसंदर्भात होत असलेल्या व्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली.
मतमोजणी केंद्रात निरीक्षकांची खोली, जिल्हा निवडणूक अधिकार्यांची खोली, वृत्तपत्र माध्यम केंद्र आदींच्या व्यवस्थेची पाहणी केली. सुरक्षा व्यवस्थेची सर्व माहिती शहर पोलीस आयुक्त बी. एस. लोकेश कुमार यांनी दिली. डीसीपी सीमा लाटकर, यशोदा वंटगुडी, कार्यकारी अभियंता संजय हुलमनी उपस्थित होते.