लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघात मुख्य रिंगणात असलेल्या 57 उमेदवारांपैकी सर्वात कमी म्हणजे 25 वय असलेला उमेदवार ठरला आहे शुभम शेळके. आणि सर्वाधिक वय असलेले 85 वर्षाचे उमेदवार ठरले आहेत सीमा सत्याग्रही लक्ष्मणराव मेलगे.
हे दोघेही महाराष्ट्र एकीकरण समितीचेच आहेत.कोण म्हणतय बेळगावातील मराठीपण कमी झालं? सीमा प्रश्नाची धार कमी झाली? या निवडणुकीच्या माध्यमातून का होईना 25 वर्षाचा तरुण आणि 85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या रुपात आजही सीमाप्रश्न जिवंत आहे.हेच दाखवून दिले आहे.
सर्वात तरुण आणि सर्वाधिक वयस्कर उमेदवारांचा आढावा घेण्याचा प्रयत्न बेळगाव live ने केलाय. आज सीमाप्रश्नी मनात आस्था असणारा युवक म्हणून शुभम शेळके यांची ओळख असून त्यांचे वय 25 आहे सध्या ते म.ए. युवा समितीच्या अध्यक्ष पदावरून काम करत आहेत.
काळा दिवस असो महामेळावा असो किंवा अजून कुठलं आंदोलन समितीच्या, प्रश्नासंदर्भातच्या प्रत्येक आंदोलनात चळवळीत अगदी लहानपणापासून उत्साहाने सहभागी झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या नंतर एकीकरण समितीत जी मरगळ आली ती संपवायच्या उद्देशाने युवा समीतिची स्थापना करण्यात मोलाचे योगदान,समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटलांच्या वक्तव्याविरोधात कोल्हापूरच्या आंदोलनात पुढाकार, सीमाप्रश्नाचं बंद पडलेलं कामकाज आणि झोपेचं सोंग घेतलेल्या महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी मुंबई मध्ये पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाचं नेतृत्व करत ते आंदोलन यशस्वी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना आंदोलनाची दखल घेऊन उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन ह्या थांबलेल्या कामकाजाला चालना दिली. कमी वेळात त्यांची प्रश्नाबाबतची तळमळ आणि लढण्याची जिद्ध पाहून नव्या कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली. युवक म्हणून उत्तर मतदार संघात वास्तव्यास असलेले शेळके उत्तर भागात जोरदार प्रचार करून मराठी माणसाला गत वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
1956 च्या सीमा लढ्यातील पहिल्या आंदोलनात सहभागी असलेले 85 वर्षीय लक्ष्मणराव मेलगे हे एक सीमा सत्याग्रही आहेत ते या निवडणुकीत सर्वात वयस्कर उमेदवार आहेत.जगाच्या पाठीवर सर्वाधिक वर्षे चाललेल्या लढ्यात या वयात देखील मराठी वोट बँक सेव्ह करण्याचा हेतूने, मराठी अस्मिते साठी ते तळमळीने निवडणूक लढवत आहेत.
शाळेत असल्यापासून सीमालढ्यात त्यांचं योगदान आहे ते या उमेदवारी च्या निमित्ताने आजही सुरूच आहे.1956 च्या सत्याग्रहात तानाजी भरमांना हेळवी यांच्या नेतृत्वाखाली धामणे गावातून आलेल्या 12 लोकांच्या तुकडीत सहभागी, ह्या आंदोलनात त्यांना 6 महिन्याची शिक्षा झाली, त्यानंतर शिक्षण पूर्ण केलं, नंदीहळ्ळी यांच्या संस्थेत काहीकाळ सचिव म्हणून काम केलं नंतर गोव्याला कामासाठी गेले तरी ह्या चळवळीतला सहभाग कमी होऊ दिला नाही प्रत्येक आंदोलनाच्यावेळी, निवडणुकांच्या वेळी ते रजा टाकून सहभागी व्हायचे, आणि आपल्या परिसरात जोरात प्रचार करायचे, संभाजी पाटलांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत उपोषण झालं त्यात त्यांचा लहान मुलगा संभाजी मेलगे यांचा सहभाग होता, इतकी वर्षे बाहेर गावात राहून सुद्धा ते ह्या लढ्याशी आणि समितीशी प्रामाणिक राहिले, सीमाप्रश्न सुटावा हा एकच ध्यास मनात ठेवून सर्वोपरी योगदान त्यांनी ह्या लढ्यासाठी दिले.
समिती मध्ये दुफळी झाली वगैरेच्या चर्चा कानावर येतात पण समिती ही आमच्या साठी एकच आहे आणि हा लढा हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा ही एकच इच्छा मनात ठेवून मी ह्या आंदोलनात सुद्धा सहभाग घेत अर्ज दाखल केला अशी प्रतिक्रिया त्यांनी बेळगाव live कडे नोंदवली आहे.
खानापूर तालुका पंचायत अध्यक्षा नंदा मारुती कोडचवाडकर,लक्ष्मी सुनील मुतगेकर या दोन समितीच्या तर दिलशाद सिकंदर ताशीलदार या तीन महिला देखील रिंगणात आहेत. एकूण 57 उमेदवार पैकी एकाचे चौथी पर्यंत,सातवी ते नववी पर्यंत तिघांचे,26 जणांचे दहावी,बारावी पर्यंत पाच तर 17 जणांनी डिग्री, 2 जनांनी पोस्ट डिग्री तर तिघांनी डिप्लोमा पूर्ण असे शिक्षण केले आहे.
या उमेदवारांत एक वकील,16 शेतकरी,16 व्यवसायिक,9 समाज सेवक 11 जण नोकरी तर तिघे स्वतःचा व्यवसाय आणि एक पेन्शनर आहेत.