राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील सोमवारी रात्री कारागृहाच्या भिंतीवरून उडी टाकून फाशीची शिक्षा झालेला कैदी फरार झाला आहे. यामुळे कारागृहातील सुरक्षा रक्षक आणि कैद्यांचे असणारे लागेबांधे उघडकीस आले आहेत. जर कैदी फरारी होत असतील तर कारागृह प्रशासन नेमके काय करते हा प्रश्न गंभीर बनला आहे.
बेंगलोर येथील परप्पन अग्रहार कारागृह नंतर बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. नुकतीच फाशी झालेला कैदी फरार झाल्याने हे कारागृह सध्या चर्चेत आहे. या कारागृहात अंडरवर्ल्ड गुंडांशी संबंध असणारे अनेक कैदी यामध्ये आहेत.
सोमवारी रात्री मुरगन उर्फ मुर्गा अंडी एप्पल हा कैदी भिंतीवरून उडी टाकून फरारी झाला आहे. या कैद्याला खून प्रकरणात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र भिंतीवरून उडी टाकून पलायन होईपर्यंत पोलीस प्रशासन काय करीत होते हा प्रश्न गंभीर बनला आहे. याप्रकरणी कारागृहाचे अधीक्षक टी पी शेष यानी जेलर चीफवार्डर आणि दोन हेड वार्डरना निलंबित केले आहे. मात्र अजुनही फरार झालेला कैदी सापडला नसल्याने पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान उभे ठाकले आहे.
बेळगाव कारागृह कैद्यांसाठी सुरक्षीत मानले जाते. मात्र काही निष्क्रिय अधिकार्यामुळे येथील कैदी फरार होऊ लागल्याने या कारागृहात संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जर कैदी फरार होत असतील तर यात नक्कीच पोलिसांचा हात आहे का? असा संशय ही निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे तरी अशा घटना होणार नाहीत याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.