कडोलीतील 24 तास पाणी योजनेचे काय?
कडोली गावात सध्या 24 तास पाणी योजनेचे वेध लागले आहेत. मात्र मागील महिन्याभरापासून हे काम सुरु करण्यात आले तरी अजूनही हे काम रेंगाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील अनेक दिवसापासून मास्टर प्लॅन राबविण्यासाठी अनेकांचे प्रयत्न करण्यात आले. मात्र कोणालाही विश्वासात न घेता हे काम करण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांचा विरोध होऊन हे काम बंद पाडण्यात आले. त्यानंतर गटाराचे बांधकाम करण्याचा घाट घालण्यात आला होता मात्र त्यालाही विरोध झाला .
आता गावात काही ठिकाणी 24 तास पाणी योजना राबविण्यात आली आहे. मात्र राबविण्यात आलेली ही योजना कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. ही योजना राबविण्यासाठी मोठया प्रमाणात निधी देखील उपलब्ध झाला खरा पण प्रत्यक्षात ती यशस्वी होण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जे नळ बसविण्यात आले आहेत त्यांना पाणी कधी येणार असा सवाल केला जात आहे.
आता चंद्रशेखर आझाद गल्ली येथे आणि इतर गल्लीतही 24 तास पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असली तरी हे काम मागील महिन्याभरापासून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत त्यामुळे भीक नको पण कुत्रे आवर अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे.