होळी व रंगपंचमी यासारख्या सणात हुल्लडबाजी व आपली शेपूट हलवीत समाजात शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांची मुळीच गय केली करणार नसल्याचा इशारा बेळगाव शहराच्या पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी दिला.
होळी सणाच्या दिवशी महिलांच्या अंगावर रंग फेकणे, त्यांची छेडछाड करणे, पाणी व रंगाने भरलेले फुगे तसेच घाणीचे पाणी मारल्यास अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी आरटीओ सर्कल नजीकच्या पोलिस भवनाच्या इमारतीत होळी व रमजान सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना सांगितले.
बेळगावात सर्व जातीधर्माचे आपले लोक आपापल्या परीने आपले सण साजरे करतात. मात्र होळी व रंगपंचमी दिवशी काही समाजकंटक प्रवृत्तीचे लोक एका वाहनावर तीन जण बसून उगाच गावात फेरफटका मारण्याची वाहने जप्त केली जाणार असून सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेतच रंगपंचमी साजरी करीत पोलीस खात्याला सहकार्य करावे आणि सणांच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिल्यास अशांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्या.
होळी व रंगपंचमी दिवशी तरुण वर्ग भांग पिऊन बेदरकारपणे आपल्या गाड्या चालवतात. तेव्हा अशा तरुणांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे विकास कलगटगी यांनी सांगून महिला व मुले रंगपंचमी उत्साहात साजरी करत असताना काही समाज कंटक शांतता भंग करण्याची शक्यता आहे. तेव्हा पोलीस खात्यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
गुन्हा आणि वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त यशोदा वंटगुडी, मार्केटचे एसीपी नारायण बरमणी, वाहतूक नियंत्रण विभागाचे एसीपी आर. आर. कल्याणशेट्टी, खडेबाजारचे एसीपी आदी उपस्थित होते.