कडोली येथील 30 हेक्टर हुन अधिक जमीन रिंगरोडमध्ये जाणार आहे. यामुळे येथील शेतकरी भूमिहीन होणार आहेत. याला विरोध करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या हरकती नोंदवून घेण्यात येत आहेत. यावेळी कडोली येथील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे
कडोली परिसरात एकूण 117 शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यावेळी आपल्या हरकती नोंदविण्यासाठी एकूण 106 शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक शेतकऱ्यांनी याला जोरदार विरोध करून आपला निषेध नोंदवला आहे.
कडोली बरोबरच परिसरातील गुंजेनहट्टी, देवगिरी गावातील शेतकरीही यावेळी उपस्थित होते. कडोली भागातील शेतजमीन ही तिबार पिकांची आहे. त्यामुळे येथील शेतजमीन गेल्यास येथील शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे ही जमीन आपण बळकावू देणार नाही, असा पावित्रा यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.
प्रांताधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपल्या हरकती नोंदविण्यात आल्या. आपले प्राण गेले तरी चालतील पण जमीन देणार नाही, असे यावेळी ठणकावून सांगण्यात आले. ही जमीन नसून आमची आई असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. आपली जमीन कधीच देणार नसल्याचे आपल्या हरकतीत नोंदवून निषेधही व्यक्त करण्यात आला.