बेळगाव महापालिकेत काम करणार्या सफाई कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी महापालिकेची प्रॉपर्टी विकण्यात आली असली तरी त्या कर्मचार्यांचा पगार देण्यात आला नाही. तेव्हा यामध्ये गैरव्यवहाराचे वारे वाहत असल्याने या घटनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केली.
सफाई कर्मचार्यांचा पगार देण्यात न आल्याने कर्मचारी मोठ्या संकटात आहेत. त्यापूर्वी पैसा हाती नसल्याने एका सफाई कर्मचार्याची मुलगी मरण पावली होती. अशा घटना घडल्या तरी महापालिकेने थेट विक्री करून पैसे मिळविले. मात्र त्या कर्मचार्याचा पगार न देता कंत्राटदारांचे पैसे दिले असल्याचे समजून आले आहे.
एकंदर या प्रकरणात गैरव्यवहार झाला असल्याचे दिसून येत असून चौकशी केल्यावर हे प्रकरण उघडकीस येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विरोधी गटनेते दीपक जमखंडी यांनी नगरसेवक विनायक गुंजटकर यांना पाठिंबा देऊन सफाई कर्मचार्यांच्या पगाराची समस्या ही गंभीर समस्या असून योग्य वेळेत डॉक्टरी उपचार न झाल्याने त्या कर्मचार्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याने मनपाच्या सर्व नगरसेवकांनी एक महिन्याचा पगार, अधिकार्यांनी एक दिवसाचे वेतन त्या कुटुंबाला द्यावे, असा सल्ला त्यांनी देताच सर्व नगरसेवकांनी याला मान्यता दिली असल्याचे समजून आले.
दिनेश नाशीपुडींकडून आंदोलन
सर्वसामान्य नागरिकांना इमारत बांधण्यासाठी महापालिकेने उंबरठे झिजवावे लागतात. तेव्हा परवानगी देण्याकरिता पूर्वीची पद्धत अवलंबावी, अशी मागणी करीत नगरसेवक दिनेश नाशीपुडी यांनी पालिकेच्या सभागृहासमोर ठाण म्हणून आंदोलन केल्याने आज शाखेच्या बैठकीत हा चर्चेचा विषय बनला होता.