बेळगाव महापालिकेचे नगरसेवक दोन दिवसाच्या म्हैसूर अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले आहेत. म्हैसूर स्मार्ट सिटीच्या चालणाऱ्या स्मार्टसिटी प्रकल्पांवर आधारित शिबिरात ते सहभागी होणार आहेत.
म्हैसूर स्मार्ट सिटी कार्यालयातून हुबळी धारवाड,बेळगाव,दावणगेरे सह पाच जिल्ह्यातील महा पालिकांच्या नगरसेवकांसाठीच्या स्मार्ट सिटी योजनेचा अभ्यास करण्यासाठी दोन दिवसीय शिबिरात नगरसेवकांनी सहभागी व्हावे असे पत्र आले होते त्या पार्श्वभूमीवर बेळगाव पालिकेचे नगरसेवक म्हैसूरच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
महापौर बसप्पा चिखलदिनी, रमेश सोंटकी, रूपा नेसरकर, मीनाक्षी चिगरे,सुधा भातकांडे, विनायक गुंजटकर ,विजय भोसले,मोहन बेळगुंदकर, रवी धोत्रे यांच्या सह ३० नगरसेवक या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
चंदीगड आणि सिमला अभ्यास दौऱ्यात किती अभ्यास केला त्याची अंमलबजावणी किती केली याचा हिशेब द्यायच्या आतच या नगरसेवकांना पुन्हा एकदा म्हैसूरची सहल करायला मिळाली आहे.या अभ्यास दौऱ्याने काय साद्य होणार हे माहीत नाही मात्र ‘यारादरे दुड्ड यल्लम्मन जात्रे’अशीच गत आहे.
मीडियातून होणाऱ्या बदनामीला घाबरत बऱ्याच वरिष्ठ नगरसेवकांनी अभ्यास दौऱ्यातुन काढता पाय घेतलाय.अभ्यास दौऱ्यातून काहीच निष्पन्न होत नाही याची कल्पना आल्याने अनेक जण दूर राहिले आहेत. तर ३० नगरसेवक व अधिकारी दोन खाजगी वाहनातून रवाना झाले आहेत.