मीन राशी (स्वामीगुरु) ॥ मिश्रफल देणारे वर्ष ॥
काळ पुरुषाच्या कुंडलीत शेवटची म्हणजे १२ वी रास असून या राशीचा अमंल विशेष उत्तरकडे असतो. या राशीची व्यक्ती स्वभावाने दयाळू, दानशूर, स्मरणशक्ती चांगली असते. परोपरकारी स्वभाव, किंचीत कधीकधी स्वार्थीपणा दिसून येतो. श्रध्दाळू, तर्कशुध्द, व्यवहारी ज्ञान उत्तम असते, याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे यांच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. हिशोबी वृत्तीच्या असतात. धार्मिक धर्म परंपरा जपणारे असतात. स्वभाव महत्वाकांक्षी असल्याने आपले ध्येय योग्य प्रकारे पूर्ण करतात. तीर्थ यात्रा प्रवास यांची त्याला आवड असते. न्यायप्रिय असतात.
या राशीच्या स्त्रिया दिसण्यात सात्विक असतात. यांना आधुनिक राहणीमान फार आवडत नाही. परंपरेचे पुजारी असतात. हे लोक जास्त करुन द्रव पदार्थांचे व्यवसाय, धार्मिक संस्था, पुरातन विभाग तसेच खाद्यान्नचे व्यापारी यात विशेष आढळून येतात. यात विशेष करुन झोपेत बडबडणे, पायाची तळपायाची दुखणी होतात. जलोदर, ज्वर येणे, निमोनिया या सारखे आजार संभवतात.
वार्षिक ग्रहमान:
जाने फेब्रुवारी याकाळात दशमात शनी भाग्यात गुरू शुक्र युती लग्नात मंगळ द्वितीयात हर्षल लाभात रवी बुध केतू यानुसार लाभातील रवी मानमान्यता देणारा संपत्ती यश सौख्यकारक राहील. परंतु याची फळे पूर्वार्धात मिळतील. 12 नंतर बुध अस्तंगत होत असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना किंवा बौद्धिक क्षेत्रातील लोकांना अडचण येईल. परंतु येथील रवीबुध युती मित्र मैत्रिणींपासून लाभदायी असतील. लग्नात मंगळामुळे आपणास उष्णतेपासून त्रास होतील. तसेच पित्ताचा त्रास रक्तामध्ये दोष निर्माण करेल. दुरावा येईल. मानसिक नैराश्य देईल. 5 फेब्रुवारीला मंगळ द्वितीयात हर्षल बरोबर येईल .
मार्च एप्रिल या काळात येणारा मंगळ हर्षल योग अपघाताचे प्रसंग येऊ शकतात. या काळात तरुण-तरुणींनी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे .व्यापारी वर्गाने या काळात नवीन गुंतवणूक केल्यास फायद्याची राहील. कारण भाग्येश द्वितीयेश परिवर्तन योग असल्याने सांपत्तिक दृष्ट्या चांगले योग राहतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्यास कालावधी चांगला राहील. स्त्रियांनी या काळात कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरातील वादविवादांना आळा घालावा. बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवावे. या काळात बोलताना समोरील व्यक्ती बरोबर फटकळपणे वागाल. तसेच नोकरी व्यापार या संबंधित काम करणाऱ्यांना परदेशगमनाचे योग येतील. 29 मार्चला गुरु धनु मध्ये तर मंगळ वृषभेत जातो . राहू तिथून केतू धनु मध्ये जातो. लग्नी येणारा रवी कीर्ती वाढवेल मान-सन्मानात वाढ करेल .15 एप्रिल शुक्र मिनेत जाईल.
मे जुन या काळात किराणा मालाचे व्यापारी हॉटेल व्यावसायिक तसेच मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थी यांना लाभदायी काळ राहील. दशमातील गुरु शनि युति या उद्योगधंद्याला उन्नतीकडे घेऊन जाईल. यासंबंधी नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना काळ चांगला आहे .नवीन हॉटेल खानावळी सुरू करण्यास उत्तम कालावधी राहील. तसेच शेतकरी वर्गाला समाधानकारक आर्थिक लाभ शेती व्यवसायातून मिळतील. परंतु राशीच्या तृतीयेत येणारा मंगळ भावंडांमध्ये परस्परविरोध निर्माण करेल शेजाऱ्यांशी विशेष जमणार नाही. लग्नातील शुक्र उच्चीचा असल्यामुळे चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल. तसेच या काळात स्त्रियांना कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदारी व्यवसायात असणाऱ्या काळ चांगला आहे. नवीन काही गुंतवणूक करावयाची फायद्याची ठरेल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य लाभेल.जून अखेर रवी मंगळ बुध राहू कर्क मध्ये जातो.
जुलै ऑगस्ट या काळात राशीच्या पंचमात बुध मंगळ युती होत असल्याने ही युती चांगली फळे देणारी नसेल. संततीच्या बाबतीत चिंता निर्माण करेल तसेच गर्भवती ना प्रतिकूलता देईल. या काळात गर्भवतीने विशेष काळजी घ्यावी. स्त्रियाना मासिक धर्माच्या तक्रारी येतील. यासंबंधीचे आजार डोके वर काढतील. चतुर्थस्थानातील ग्रह वास्तू जमीन याबद्दल अस्थिरता देतील. जुलै महिन्यातले ग्रहण शुभ फळ देणारे राहील. ८ ऑगस्टला मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल. ऑगस्ट चा पूर्वार्ध बरा राहील. या काळात बुध शुक्र मंगळ अस्थगतस्थितीत असल्याने चांगले परिणाम मिळणार नाहीत. आर्थिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने चढउतार राहणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर सप्तमात बुध शुक्र भाग्यातील गुरू या काळात तरुण-तरुणींचे विवाह योग येथील. ज्यांची लग्ने जुळली नाहीत अशांचे विवाह जुळतील. पंचमातील रवि-मंगळ सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना भरती व बढती देईल. पण या काळात वडिलांच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. तसेच ज्यांना हृदयाचे आजार आहेत अशांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. हृदय विकारांचे त्रास तसेच पाठीचे त्रास या काळात होतील. ऑक्टोबर मध्ये बक्षीस रूपाने एखादा लाभ होईल.
नोव्हेंबर डिसेंबर 9 नोव्हेंबरला ला गुरू दशमात येतो तसेच अष्टमातील मंगळ पैशाचा अपव्यय करेल. वयस्कर व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी या काळात आजारामुळे अंथरुणात पडून राहण्याची वेळ येऊ शकते, काळजी घ्यावी. कर्जबाजारीपणा येऊ नये याची काळजी घ्यावी. तसेच डोळ्या संबंधित विकार होतील .या काळात विचित्र अपघात येण्याचा संभव आहे. त्यामुळे वाहनावर नियंत्रण ठेवावे. द्वितीयातील हर्षल अष्टमातील मंगळाशी प्रतियोग करतो. या काळात प्रवासात विशेष काळजी घ्यावी हे वर्ष आपणास मिश्रफल देणारे राहील.
मीन राशीची नक्षत्रे :
पूर्वाभाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती
पूर्वाभाद्रपदा स्वभाव : व्यवहार कुशल, धनी (दी)
उत्तर भाद्रपदा स्वभाव : न्यायप्रिय, त्यागी (दु, भ, झ)
रेवती स्वभाव : कुशाग्रबुध्दी, श्रध्दाळू (दे, दो, चा, ची)
उपासना : पूर्वाभाद्रपदा असणार्यांनी शंकराची सेवा करावी, शिवलीलामृतचा पाठ करावा, चंद्राला खीरचा नैवेद्य दाखवावा.
उत्तराभाद्रपदा असणार्यांनी शनिवारी मारुतीला मोतीचुराचे लाडू चढवावे. शनिस्त्रोत्र वाचावे.
रेवती नक्षत्र असणार्यांनी : बुधवारी विष्णूला तुळशी अर्पण करावी व हिरवे मूग अर्पण करावे. विष्णू सहस्त्र नाम वाचावे.
शुभवार : मंगळवार, गुरुवार
शुभ महिने : ३, ४, ८, ९
शुभ रंग : परपल, पिवळा
शुभ रत्न : पुष्कराज राशीप्रमाणे जोतिषांच्या सल्ल्याने घालावे. अंक शास्त्राप्रमाणे ३ अ अंक गुरुचा.