कारला जलसमाधी मिळाल्यामुळे भीषण अपघात घडल्याची घटना मंगळवारी सकाळी ताजी असताना दुपारी दीडच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर यमनापूर जवळ महामार्गावरून ट्रक कोसळल्याने एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
रफिक कुतूबुद्दीन ताशीलदार वय 60 रा.निपाणी असे मयत ट्रक चालकाचे नाव असून सिकंदर नायकवाडी हा वाहक जखमी झाले त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की या भीषण अपघातात ट्रकचे संपूर्ण नुकसान झाले असून अपघातस्थळी ट्रक पूर्णपणे विस्कळीत होऊन पडला होता. एम एच 09 2790 क्रमांकाच्या ट्रक कोल्हापूर कडे जात होता. चालकाचे कंट्रोल सुटल्याने ट्रक ब्रिज वरून खाली कोसळला. ट्रक ची केबिन सर्विस रस्त्यावर चालकाच्या अंगावर पडल्याने सर्व्हिस रोडवर पडलेला चालक खाली गटाराच्या काँक्रीट वर चिरडून घटनास्थळीच ठार झाला आहे.
सर्व्हिस रोडवर कोणी नसल्यामुळे ब्रिजवरून ट्रक खाली कोसळताना दुसरे कोणी चिरडू शकले नाही नाहीतर मृतांची संख्या आणखी वाढली असती. बघ्यांची गर्दी झाली होती त्यांनी कळवल्यानंतर काकती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मयत ट्रक ड्रायव्हरचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला तर जखमीला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनास्थळी ट्रक चे सर्व भाग सुटे होऊन पडले असून ट्रक मधील सामान सुध्दा विखरून पडले होते. रहदारी उत्तर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.