बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगाव शहरात १६ नवीन ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत. त्यासाठी १ कोटी ९९ लाख २० हजार रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
सिग्नल बसवणे, त्याचे कामकाज चालवणे आणि दोन वर्षीय वॉरंटी मुदत व आणखी एक वाढीव वर्ष असे एकूण तीन वर्षे दुरुस्तीची कामे करणे यासाठी ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड ने ही निविदा काढली आहे. बेळगावमध्ये काही मोजकेच ट्रॅफिक सिग्नल सुरू आहेत. कॉलेज रोड, राणी चन्नमा सर्कल, अशोक सर्कल या तीन ठिकाणी फक्त सिग्नल सुरू असतात.
बाकीच्या ठिकाणी हे १६ सिग्नल बसणार असून त्यांची ठिकाणे अजून ठरलेली नाहीत किंव्हा जाहीर करण्यात आलेली नाहीत.
धर्मवीर संभाजी सर्कल सारख्या ठिकाणी सिग्नल नसल्याने तसेच पोलिसही तेथे थांबत नसल्याने रहदारी राम भरोसे सुरू आहे. सिग्नल बसवले तर महत्वाचे सिग्नल व इतर ठिकाणी रहदारी सुरळीत चालणे शक्य होणार आहे.
सिटिझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी नुकतीच या विषयावर निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. बेळगाव मध्ये सिग्नल सुरू नसल्याने कशी अवस्था आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला होता यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.