ख्रिस्ती धर्मियांवर हल्ला प्रकरणी पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातील पाच जणांना अटक केली आहे. जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यात अज्ञात जमावाने ख्रिस्ती धर्मियांची प्रार्थना सुरु असताना हल्ला केला होता. चाकू, तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात 10 जण जखमी झाले होते. चंदगड पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली असून सहा आरोपी अद्याप फरार आहेत. सहा दिवसानंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.
अजय आप्पाजी पाटील वय 23 हंदीगनूर,गजानन पाटील वय 24,अमोल मोदगेकर 23 रा. निलजी, महेश पाटील वय 23 अतवाड ,गोपाळ कलखांबकर वय 20 हिंडलगा (सुळगा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चंदगड तालुक्यातील कोवाड या गावात प्रार्थनेसाठी जमलेल्या ख्रिस्ती धर्मियांवर अज्ञात जमावाने हल्ला केला होता. भिमसेन चव्हाण यांच्या घरी तळमजल्यात प्रार्थना सुरु होती. यावेळी एकूण 40 जण उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश होता. यावेळी 20 ते 30 वयोगटातील 25 ते 30 अनोळखी तरुणांनी गज, लाठ्या, काठ्या, चाकू, सुरा आणि तलवारी घेऊन हल्ला चढवला.
हल्ल्यात सहा पुरुष आणि चार महिला जखमी झाले होते. तसंच गाड्यांचंही नुकसान झालं होतं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तपासासाठी सहा पथकं स्थापन करण्यात आली होती. सर्व आरोपी बेळगावचे रहिवासी असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत पाच जणांना अटक केली. चौकशी केली असताना पोलिसांना इतर आरोपींची माहिती मिळाली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्यांना अटक करु असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.