बेळगाव महानगरपालिकेवर मराठी माणसाची सत्ता अबाधित आहे. यावेळी आरक्षणाप्रमाणे उमेदवार नव्हता नाहीतर मराठी माणूसच महापौर झाला असता. सगळीकडे मराठी माणसाला ठोकून पाहिले आता महानगरपालिकेवर आपली मेजॉरीटी झाली तर आपण राज्य करू असे स्वप्न बघत बसलेल्या काही माणसांचे स्वप्न बेळगावचे वकील धनराज गवळी यांनी उध्वस्त केले आहे.
मराठी माणूस निवडून येऊ नये या पद्धतीने करण्यात आलेले नवे वॉर्ड आणि त्याचप्रमाणे बदललेले आरक्षण न्यायालयीन स्थगिती आदेशाने रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे चुकीचे मनसुबे धरून पेरण्यात आलेली निवडणूकच आता स्थगित झाल्याने मराठी माणसाची शक्ती वाढली आहे.
यापूर्वी लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघ बदलून असेच प्रयत्न झाले होते पण त्यावेळी न्यायालयीन बळ मिळाले नव्हते. सध्या बदललेले वॉर्ड आणि आरक्षणाचा फायदा घेऊन मराठी नगरसेवक कसे कमीत कमी निवडून येतील याचे स्वप्न बघत होते पण ते स्वप्न अर्धवट राहिले आहे.
धनराज गवळी यांनी आपल्याबरोबर आणखी काही नगरसेवक व मित्रांना घेऊन न्यायालयात धाव घेतली त्यामुळे चांगला न्याय मिळाला असून सीमावासीय जनतेने कर्नाटक उच्च न्यायालयाचे उपकार मानावे तेवढे कमी आहेत.
आपले वॉर्ड सोयीचे झाले म्हणून काही तळ्यात मळ्यातले मराठी नेतृत्व शांत बसलेले होते. मराठी मतांवर निवडून येऊन राष्ट्रीय पक्षांचे एजंट झालेल्या अशा लोकांनाही चाप बसला आहे.
मनपाच्या निवडणुकीत आपली सत्ता येणार म्हणून सांगत फिरणाऱ्या राष्ट्रीय पक्षातील लोकांनाही आता डोक्याला हात लावून बसावे लागणार आहे.