गुंडेनहट्टी येथील त्या अंगणवाडी सेविकेला तिच्या भावानेच मारल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून खुनाची खबर कुणाला सांगू नव्हे म्हणून तिच्या मुलाचे म्हणजेच आपल्या भाच्याचे डोळेही काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
जयश्री कल्लाप्पा बेळगावकर (वय ४२) या अंगणवाडी सेविकेचा अचानक खून झाला होता. या खुनाचे गूढ उलगडत नव्हते.अखेर पोलिसांनी चौकशीसाठी तिचा भाऊ रवी प्रल्हाद बडसकर( वय ३०) रा. गुंडेनहट्टी याला ताब्यात घेऊन
योग्य चौकशी केली असता आपणच आपल्या बहिणीचा खून केला असून गुन्हा उघडकीस येऊ नव्हे म्हणून भाच्यालाही ठार करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्याने दिली आहे.
सोमवार दि २४ रोजी हे प्रकरण घडले होते. जयश्री यांचे एका तिऱ्हाईत व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा खून झाला आहे. बहिणीच्या डोकीत नांगराच्या फाळाने वार करून हा खून करण्यात आला आहे, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. वार केल्यानंतर भाचा अनुराग हा सुद्धा जागे झाल्यानंतर आपले पितळ उघडे पडेल या भीतीने त्याच्यावरही वार झाले पण तो वाचला असला तरी त्याचे डोळे मात्र गेले आहेत.