कर्नाटकाचा किंव्हा म्हैसूरचा वाघ म्हणून ज्याला उपाधी देण्यात आली त्या टिपू सुलतान बद्दलही कर्नाटक सरकार दुटप्पीच भूमिका घेत आहे. ही भूमिका कशी दुटप्पी आहे याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते मालोजीराव अष्टेकर यांनी बेळगाव live ला दिली आहे.
सीमाभाग कर्नाटकाचाच आहे हे सुप्रीम कोर्टात सांगताना कर्नाटक सरकारने टिपू सुलतान चा उपयोग करण्याचा प्रयत्न केला होता पण टिपूच्या सर्व नोंदी मराठीतच मिळाल्याने कर्नाटकाला ती माहिती उघड करता आली नव्हती. हे एक गुपित मालोजीराव अष्टेकर यांनी उघड केले आहे. आज टिपू जयंती बद्दल जो काही वाद सुरू झाला आहे त्या वादात कर्नाटक सरकारचा खरा चेहरा उघड करून दाखवणारी ही माहिती नोंद करून ठेवण्यासारखी आहे.
टिपू सुलतान हा मुस्लिम राजा होता.सध्याचे कर्नाटक आणि पूर्वीच्या मुंबई व म्हैसूर प्रांतावर त्याचे राज्य होते.म्हैसूरचा राजा अशी त्याची ओळख होती आणि या संस्थानवर पूर्वी त्याचे वडील हैदर व नंतर त्याने राज्य केलेलं आहे.पूर्वी साम्राज्य वाढवण्याच्या लढाया होत होत्या. यामुळे आपले साम्राज्य वाढवण्यासाठी टिपूने मराठा साम्राज्याबरोबरही अनेक लढाया केल्या आहेत व अनेकदा तह सुद्धा केलेले आहेत.नाना फडणवीस, महादजी शिंदे यांच्याशी टिपूच्या लढाया झाल्या होत्या.या टिपू सुलतान ने कर्नाटकातील नरगुंद, धारवाड, शिमोगा या भागावर वर्चस्व निर्माण केलं होतं. ब्रिटिशांविरुद्धही तसेच मुस्लिम राजवट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैद्राबाद च्या निजाम विरुद्धही टिपूने अनेक लढाया केल्या आहेत.
कर्नाटकवासीयांनी ब्रिटिश सत्तेला दणका देणाऱ्या या टिपूच्या म्हैसूरचा वाघ म्हणून पदवी दिली. सर्वांना तो याच कारणाने माहीत होता.ब्रिटिशांविरुद्ध लढणारा फार मोठा योद्धा म्हणून त्याचं कर्नाटकाला फार कौतुक होतं.
इतकेच नव्हे तर विशेष म्हणजे त्यावेळी महाराष्ट्राने कर्नाटक विरुद्ध सीमाप्रश्नाचा दावा दाखल केला त्यावेळी कर्नाटक सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी पुराव्यादाखल काही कागदपत्रे दाखल करायचं ठरवलं त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेल्या एडीयुराप्पा नी टिपू आणि राणी कित्तूर चन्नाम्मा यांचे कागदपत्र सादर करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही योध्याचा सीमाभागाशी संबंध नसतानाही त्यांचे संबंधीत कागदपत्र आणून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत दाखल करण्याची घोषणा व ठराव कर्नाटकातील एडीयुराप्पा यांच्या नेतृत्वखालील भाजप सरकारने केलेला आहे. यानंतर एक समिती स्थापन केली व लाखो रुपये मंजूर करून या समितीचे सभासद इंग्लंडला पाठवण्यात आले. तेथील पुरातत्व वस्तू खात्याकडून ती कागदपत्रे मिळवून या खटल्यात वापरण्याचा प्रयत्न केला गेला. ती कागदपत्रे टायगर पेपर्स म्हणून ओळखली जात होती.
महाराष्ट्र सरकार विरुद्ध पुरावे गोळा करताना टिपू सुलतान चालतो तेंव्हा तो कन्नडिग असतो मग त्याची जयंती करताना का विरोध करत आहेत? याचा विचार आता कर्नाटकातील जनतेने करण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे टिपूच्या बाबतीत इंग्लंड मध्ये मिळालेली ती कागदपत्रे शुद्ध मराठीत आहेत, त्यामुळे ती उघड करू शकले नाहीत.हे सर्व करताना येडियुराप्पा भाजपात होते. भाजपातून बाहेर पडून केजीपी पक्ष स्थापन केला तेंव्हा त्यांनी टिपू जयंती स्वतः केली होती. आता तो मुसलमान आहे म्हणून विरोध आहे मराठी माणसा विरुद्ध उपयोग करतांना त्यांना तो चालतोय.
टिपू हा एक योद्धा होता तो मराठ्यांबरोबर तह करत होता आणि मराठा विरुद्धही लढला आहे. पण तो इतिहास आहे आणि त्याने ब्रिटिशांबरोबर युद्ध करून गाजवलेला पराक्रम आहे हे नाकारता येणार नाही.