बेळगावात कर्नाटक हिवाळी अधिवेशनाला दि १० डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. मागिल काही वर्षांपासून हे अधिवेशन भरविण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही अधिवेशनाला मोर्चाची आव्हाने समोर ठाकण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांच्या ऊस दराचा मुद्दा ऐरणीवर आला असून मागील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात दंड थोपटला आहे. शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी बैठकावर बैठका सुरू आहेत. मात्र त्यांना यश येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच शेतकरी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिवेशन संपेपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या या भूमिकेमुळे सरकारची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे.
याचबरोबर कामगार संघटनाही आपला मोर्चा सुवर्णविधानसौध कडे वळविणार असल्याची माहिती मिळाली आहे. कामगार संघटनेच्या मागण्या वारंवार डावलण्यात येत असल्याने कामगार एकवटणार आहेत. त्यांच्या समस्याही सोडविण्यासाठी सरकार कोणती रणनीती आखणार याकडे देखील लक्ष लागून राहिले आहे.
यासह उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी अनेक संघटना हल्लाबोल करणार आहेत. मागील अनेक अधिवेशनात उत्तर कर्नाटकला विकासाचे गाजर दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. त्यामुळे अनेक संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे सरकार मोर्चे व आंदोलकांची आव्हाने पेलण्यास कोणता तिर मारणार आहेत, हे लवकरच समजणार आहे.