दसरा म्हटला की ९ ते १० दिवस देवांना घट्ट बसवायचे…. कुणी कॅम्प सारख्या भागात केली तर दुर्गापूजा…. मारवाडी आणि सिंधी लोकांचा गरबा दांडिया….. आयुध पूजन आणि शेवटच्या दिवशी सीमोल्लंघन… बेळगावातील दसरा इतक्या पुरताच मर्यादित होता. गणपती झाला की लगेच येणारा हा सण बेळगावमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षात फारच वाढला आहे. पहाटेच्या दौड पासून ते मध्यरात्री पर्यंत चालणाऱ्या दांडियापर्यंत बेळगावचे हिंदू लोक सहभागी होत असून दसऱ्याची क्रेझ वाढत आहे.
२० ते २५ वर्षांपूर्वी इतकी क्रेझ नव्हती. शिवप्रतिष्ठान संघटनेने दौड सुरू केली तेंव्हा जास्तीत जास्त १०० लोक पळायला येत होते, पण आता दुर्गामाता दौड चे स्वरूप भव्य झाले आहे. पहाटे उठून दौडचे स्वागत करण्यासाठी रांगोळी घालण्यापासून ते दौड मध्ये सहभागी होण्यापर्यंत उत्साह वाढला आहे. दररोज हजारो तरुण तरुणी महिला आणि लहान मुले दौडीत सहभागी होऊन एक नवीन परंपरा निर्माण होत आहे. दौडीला जाणारे तरुण आणि महिलांचे ग्रुप वाढत आहेत यामुळे दसरा सणात उत्साही वातावरण तयार होत आहे.
पूर्वी फक्त कॅम्प भागात दसऱ्याला दुर्गेचे पूजन होत होते पण आता शहरात सगळीकडे गणपती प्रमाणे दुर्गापूजन करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कांगले गल्लीत भव्य मंडप घालून केलेली दुर्गा पूजा साऱ्या शहराला आकर्षित करून घेत असून याची प्रेरणा घेऊन गल्लो गल्लीत हे प्रमाण वाढत आहे.
(फाईल फोटो बेळगाव रास गरबा)
रास गरबा आणि दांडियाने तर नवरात्री जागवल्या जात आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. मारवाडी आणि गुजराती समाजाच्या या परंपरेत बेळगावचे नागरिकही सहभागी होत आहेत. दसरा सण हा आता फक्त सीमोल्लंघन पुरता मर्यादित नसून तो अनेक पातळीवर साजरा होत आहे.बेळगाव शहरात नवरात्रीची क्रेज वाढत असून या सणाला देखील वेगळं महत्व येत आहे.