महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्या निमित्त बेळगाव चा सीमा लढा न्यायचा आहे की नाही? वाचा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांचे विचार.
भाषावार प्रांतरचना जेंव्हा व्हायची ठरली त्यावेळी कर्नाटकचा फार मोठा प्रदेश त्यावेळच्या म्हैसूर प्रांतात जास्त नव्हत्या. कन्नड भाषिक त्यावेळच्या मुंबई, मद्रास, हैदराबाद, म्हैसूर व कुर्ग या भागात विभागलेले होते. म्हैसूर संस्थान आणि आजूबाजूचे जिल्हे असा अतिशय छोटा मैसूर राज्याचा प्रदेश होता.
या सगळ्या कन्नड भाषिक लोकांना एकत्रित आणण्यासाठी १९१७ साली कर्नाटक एकीकरण समितीची निर्मिती झाली. महाराष्ट्रातील मराठी लोकांना एकत्रित आणण्यासाठी १९४६ साली महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन झाली त्यापेक्षा कितीतरी आधी कन्नड भाषिक एकत्रिकरणाचे आंदोलन सुरू झाले होते. कन्नड भाषिकांवर अन्याय झाला होता. ते विभागलेले होते.
ज्याप्रमाणे आम्ही लढतोय तसाच लढा कन्नड भाषिक प्रदेश एकत्र आणण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. आम्ही मराठी भाषिक काही वेगळे लढत नाही. कन्नड साहित्य परिषदेनेही यासाठी प्रयत्न केले आहेत.
भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा पुढे आला त्यावेळी राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती झाली. या आयोगानं महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना एकत्र आणणे हा प्रयत्न सोडून महाराष्ट्र आणि गुजरात यांचं द्विभाषिक राज्य केलं आणि महाराष्ट्रातील त्यावेळच्या मुंबई राज्यातील बेळगाव, धारवाड, कारवार हे जिल्हे चंदगड वगळता कर्नाटकात घालावेत अशी शिफारस केली. हे करतांना या जिल्ह्यामध्ये विशेषतः कारवार आणि बेळगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठी भाषिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. हा प्रदेश महाराष्ट्रात जोडावा या मागणीसाठी राज्य पुनर्रचनेआधी पासूनच आंदोलने झाली होती. गेली ६२ वर्षे सीमाभागातील आणि महाराष्ट्रातील जनता हा प्रदेश महाराष्ट्रात विलीन केला पाहिजे कारण इथल्या मराठी भाषिकांवर अन्याय झालेला आहे. ही मागणी सतत करत आलेले आहेत आणि या प्रश्नावर १९५५ मध्ये संसदेतही चर्चा झाली आहे परंतु त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या चर्चेत भाग घेऊ शकले नाहीत.
म्हणून काही लोकांनी बाबासाहेब राज्य पुनर्रचनेवर का बोलत नाहीत यावर टीका केली. याला अनुसरून डॉ आंबेडकरांनी थॉट्स ऑन लिंगविस्टिक स्टेट्स हे पुस्तक लिहिले आणि हे पुस्तक लिहीत असतांना आज सीमावासीय जनता जे अन्याय सोसत आहे तेच नेमकं मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात त्यांनी केला आहे. भाषावार प्रांतरचनेत कुणावर अन्याय झाला याची यादीही त्यांनी दिली आहे.
आज सीमाप्रश्नाच्या लढाईत या महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधने गरजेचे आहे.