एकेकाळी मराठी चित्रपटाचे माहेर घर म्हणून बेळगावकडे पाहिले जात होते. आता मात्र बेळगावच्या रसिकांना आणि येथील चित्रपट गृहाना मरगळ आल्याचे दिसून येत आहे. सण २०१५-१६ सलात मराठी चित्रपटानी धुमाकूळ घातला होता. मात्र मागील दोन वर्षांपासून चित्रपट गृहात मराठी सिनेमा अधिक काळ तग धरू शकत नाहीत.
कट्यार काळजात घुसली, दुनियादारी सह मध्यतरी अनेक चित्रपटांनी सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला होता. सैराटने तर एकच धुमधडाक्यात आपली एन्ट्री केली होती. त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले असे वाटत होते.
बेळगाव हे संगीत, नाटक, चित्रपट यासह अनेक कलागुणांना जोपासणारे आणि दाद देणारे शहर म्हणून परिचित आहे. त्यामुळे येथील रसिक नेहमीच चांगल्या चित्रपट आणि नाटकांच्या शोधात असतात. बेळगावात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात पूर्वी हंस आणि त्यानंतर ग्लोब चित्रपटगृहांची भूमिका मोलाची ठरते. त्यांनी बेळगावात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार की नाही अशा विवंचनेत असताना रसिकांना भरघोस मराठी चित्रपटांची मेजवानी दिली.
त्यानंतर बेळगावात एकापेक्षा एक असे मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली. बेळगाववर दोन ते तीन वर्षे मराठी चित्रपटांचा प्रभाव पडला. त्यामुळे केवळ कन्नड चित्रपट लावणाऱ्या चित्रपट गृहानीही मराठी चित्रपट लावण्यास सुरुवात केली. आता मागील दोन वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित होत नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे बेळगावात पुन्हा चांगले दिवस येतील का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.