ऑनलाइ औषध विक्रीचे सध्या प्रस्थ वाढत आहे. अनेक महागडी आणि स्वस्त औषधेही आता ऑनलाइन मागविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे दुकानातून औषध विक्री करणाऱ्यांना याचा फटका बसत असल्याची ओरड सध्या सुरू झाली आहे.
ऑनलाइन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेने आवाज उठविला होता. मात्र याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून आले आहे. उलट सोईचे आणि वेळ वाचविण्याच्या दृष्टीने ऑनलाइन औषध विक्री करण्याचे प्रस्थ अधिकच फैलावत आहे.
औषधांची ऑनलाइन विक्री ड्रग्ज आणि कॉस्मेटिक कायदा 1940 आणि नियम 1945 नुसार नागरिक वर्गासाठी घातक आहे. त्यामुळे हा प्रकार बंद करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करीत नागरिक डिजिटल इंडियाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन ऑनलाइन वरच अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे.
जर ऑनलाइन खरेदी केल्यास त्याला डॉक्टरांचा सल्ला नसतो. त्यामुळे ऑनलाइन विक्री धोक्याची ठरू शकते. तेव्हा डॉक्टर यांच्या सल्यानुसारच औषध घ्यावीत असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र ज्या वेळी औषध विक्री करण्यात येते तेव्हा डॉक्टरांनी लिहून दिलेली चिट्ठी ऑनलाईन मागवून घेऊनच त्यानंतर ओषध पाठविण्यात येतात, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता बरेच रुग्ण व नातेवाईक ऑनलाइन औषध खरेदीवर भर देत असल्याचे दिसून येत आहे.