बेळगाव शहरातील वाहन संख्या वाढत आहे. पण रहदारीचे योग्य नियोजन होत नाही. रहदारी पोलिसांचे हे प्रमुख काम आहे पण ते हे काम न करता नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यातच जास्त वेळ घालवत आहेत. त्यांना दंड वसुलीचे टार्गेट दिले गेले आहे आणि रहदारी नियोजनाचे काम बाजूलाच पडत आहे.यामुळे रहदारी पोलिसांना फक्त वाहतूक नियंत्रणाचेच काम लावण्यात यावे अशी मागणी आहे.
बेळगाव शहरात रहदारी पोलीस ठिकठिकाणी घोळक्याने थांबून फक्त दंड वसुलीच्या कामात गुंतवण्यात आले आहेत. दंड वसुलीच्या बाबतीत विक्रम करण्याच्या उद्देशाने हे काम सुरू असले तरी जिथे गरज आहे तिथे रहदारी पोलीस उपलब्ध होत नाहीत यामुळे गरजेची कामे त्यांना करायला लावा अशी सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देण्याची गरज आहे.
रहदारी पोलिसांची नेमणूक ही वाढीव रहदारी वळविणे, अडलेली कोंडी सोडवणे, ज्या ज्या ठिकाणी समस्या आहेत तेथे जाणे, वाहन अपघात जास्त होत असलेल्या ठिकाणी उपाययोजना करणे ही आहेत पण या कामांना फाटा देण्यात येत आहेत. अपघात झाला की पोलीस जातात पण उरलेल्या वेळेत दंड वसूल करण्यापलीकडे त्यांच्याकडे काम नसते याचा विचार केला पाहिजे.
रहदारीच्या समस्या शहरात वाढत चाललेल्या आहेत तेंव्हा बेळगाव पोलीस दलाने त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. दंड वसुली आणि हेल्मेट सक्तीच्या दृष्टीने काही प्रमाणात पोलिसांना नेमून बाकीच्यांना खुले सोडावे अन्यथा पोलीस नेहमी हातात पावती पुस्तके घेऊन फिरत राहणार असून रहदारीचा खेळखंडोबा होत राहणार आहे.