Sunday, December 22, 2024

/

हृदयविकार- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

आपण प्रत्येकाने हृदयविकाराच्या झटक्याबद्दल ऐकलेले असते. हृदयविकाराचे प्रमाण वाढतच आहे, आता तरुण वयातही हा आजार होऊ लागला आहे. हृदयविकाराचा झटका अचानक येतो. काही जण सुरुवातीसच दगावतात. आणि काही तर झोपेतच जातात. काही जणांना हॉस्पिटलमध्ये मृत्यू येऊ शकतो तर काही लोक जगतात पण बरेच खर्चिक उपाय करावे लागतात. खरं म्हणजे हृदयविकार टाळता येतो. झटका यायच्या आधी हृदयविकार ओळखतापण येतो. म्हणूनच ही माहिती लक्षात ठेवा आणि इतरांना सांगा.

heart day
हृदयविकाराची कारणे
हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होणे, अतिरक्तदाब ही हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य कारणे आहेत. कधीकधी हृदयाच्या रक्तवाहिन्यात गुठळ्या अडकून झटका येतो.
रक्तवाहिन्या चरबीच्या थरांनी खराब होतात. पाण्याचे नळ जसे गंजतात तसेच हे असते. यामुळे हृदयाला स्वत:लाच रक्तप्रवाह कमी पडतो. विश्रांतीत एकवेळ हे चालू शकते. पण अतिश्रम, अतिथंडी किंवा मानसिक ताणतणावात रक्तप्रवाहाची मागणी वाढते. अशा वेळी पुरवठा कमी पडून झटका येतो.
रक्तप्रवाह कमी पडल्याने हृदयाचा संबंधित स्नायूभाग मरतो. मरणारा स्नायूभाग जास्त असेल तर हृदय बंद पडते, अन्यथा चालू राहते. हृदयाला मुख्य तीन रक्तवाहिन्या असतात. यातील कोठली रक्तवाहिनी आणि किती अडलेली आहे यावर बरेच अवलंबून असते.
रक्तवाहिन्यांचा आजार आणि अतिरक्तदाब हे कायमचे आजार असतात.अतिखाणे, तेलतूप जास्त खाणे, मधुमेह, बैठे जीवन, धूम्रपान, ताणतणावाचे जीवन, लठ्ठपणा आणि काही प्रमाणात आनुवंशिकता ही त्याची कारणे आहेत.पूर्वी हा आजार चाळीशीत सुरू व्हायचा. तो आता विशी-तिशीतच सुरू होतो.
लक्षणे
काही जणांना हृदयविकाराच्या झटक्याची वेदना जाणवते तर काही जणांना काहीच जाणवत नाही. कार्डिओग्राम काढताना काही जणांना जुना हार्ट ऍटॅक आलेला दिसून येतो. याउलट काही जण झोपेतच हृदयविकाराने मृत्यू पावतात.पहिल्या झटक्यातच काहीजण दगावू शकतात.
हृदयविकाराची वेदना छाती, खांदा, बेंबीच्या वरच्या भागात, पाठीत किंवा वर जबड्यापर्यंत कोठेही जाणवते.
रुग्णाला दम लागतो, घाम आणि धडधड जाणवते. नाडी वेगाने चालते किंवा कधीकधी संथ चालते.
रक्तदाब कमी झाल्याने कधीकधी घेरी येऊन माणूस पडतो.
प्राथमिक उपचार आणि पाठवणी
रुग्णाला आडवे पडून राहायला सांगा, दोन्ही पायांखाली आधार देऊन पाय उंचवा. यामुळे रक्तप्रवाह हृदय व मेंदूकडे जास्त वळतो.
रुग्णाला शांत राहायला आणि संथ श्वसन करायला सांगा.
कपभर पाण्यात ऍस्पिरीनची गोळी विरघळून प्यायला द्या.
नायट्रोग्लिसरीनची गोळी जिभेखाली धरायला द्या.
प्राणवायूचे सिलींडर असेल तर मास्क लावून द्या.
नाडी आणि शुद्ध तपासा. नाडी लागत नसेल तर कृत्रिम हृदयक्रिया-श्वसन द्यावे लागेल. यासाठी कोणी मदतीला असल्यास बोलवा.
रुग्णवाहिकेतून रुग्णालयात न्या. काही शहरात हृदयविकारासाठी खास कार्डिऍक ऍम्ब्युलन्स असते.
संबंधित वैद्यकीय तज्ज्ञाला फोन करून कल्पना द्या. रुग्णाचे नाव पत्ता माहीत नसल्यास शोधा आणि नातेवाइक, मित्रांना कळवा.
वैद्यकीय विम्याबद्दलपण चौकशी करून घ्या.
रुग्णालयातले तातडीक निदान
कार्डिओग्राममुळे अडलेली रक्तवाहिनी आणि बाधित स्नायूभागाचा अंदाज येतो.
रक्तातील काही एन्झाईम –म्हणजे किण्वे–यांची पातळी वाढलेली असते.
कॉरोनरी सिटीस्कॅन असेल तर अडलेली रक्तवाहीनी स्पष्ट समजू शकते.
एको कार्डिओग्रामने हृदयाच्या कप्प्यातील रक्तप्रवाह समजतो.
तातडीक उपचार
उपचारांसाठी वय, रक्तप्रवाह किती अडला आहे, मधुमेह इ. घटकांचा विचार करावा लागतो.
रक्तवाहिनीतील गुठळी विरघळण्यासाठी औषध लागत असल्यास 2तासांत ते द्यावे लागते. हे औषध खर्चिक पण उपयुक्त आहे.
तातडीक एन्जिओग्राफीचा खर्च सुमारे 10 हजार पर्यंत येतो.
काही रुग्णांना एन्जिओप्लास्टीची गरज भासते. एन्जिओप्लास्टीचा खर्च स्टेंटवर अवलंबून असतो.
काही रुग्णांमध्ये बायपास शस्त्रक्रिया लागते. यात अडलेल्या रक्तवाहिनीला पर्यायी मार्ग म्हणून शरीरातील रक्तवाहिनीचा तुकडा लावला जातो. ही शस्त्रक्रिया अर्थातच खर्चिक आहे. शस्त्रक्रिया तातडीक की पूर्वनियोजित आहे यावर याचे कमीजास्त यश अवलंबून असते.
प्रतिबंध
मधुमेह आणि अतिरक्तदाब या आजारांना दूर ठेवा. शरीरभार आणि कंबर-नितंब गुणोत्तर संतुलित राखा.
जीवनशैली निरोगी ठेवण्यासाठी आहार, ताणतणाव, शारीरिक श्रम, झोप हे महत्त्वाचे घटक आहेत. धूम्रपान अतिशय घातक आहे.
फळे, भाजीपाला, लिंबू, लसूण, हळद आणि योग्य तेलांचा वापर करा.
आठवड्यातून निदान चार दिवस दमसांस म्हणजे ऐरोबिक प्रकारचे व्यायाम करा.
योगासनेही चांगली असली तरी दमसास व्यायामांना पर्याय नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.