बेळगावचा गणेशोत्सव अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. आगमनाच्या मिरवणूका, उत्साही घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक पातळीवर तर मुंबई आणि पुण्याच्या बरोबरीने उत्साही वाटचाल ही या उत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. आज या उत्सवात विदेशी पाहुण्यांनी सहभागी होऊन शोभा वाढवली आहे.
झेंडा चौक येथील येथील मंडळाच्या सार्वजनिक मूर्तीच्या आगमन सोहळ्यात हे विदेशी दांपत्य सहभागी झाले होते. रशिया येथून बेळगावला रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एक दांपत्याने स्वतःहून या आगमन मिरवणुकीत भाग घेतला आणि साऱ्यांच्या आकर्षणाचा विषय ते बनले होते.
१९०५ साली स्थापन झालेल्या या मंडळानेही त्यांना सामावून घेतले आणि गणेशाबरोबरच ढोल वाजवत सहभागी झालेल्या या विदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
गणेशोत्सवाचे भाद्रपद महिन्यातील हे दहा दिवस सर्वांच्याच दृष्टीने मंतरलेले आणि भारलेले असतात. कारण फक्त भक्तीच नव्हे तर राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची शिकवण हा उत्सव देतो. या उत्सवाची परंपरा विदेशी लोकांनाही खुणावते हे या प्रसंगातून दिसले आहे.
धर्मवीर संभाजी चौकात ढोल वाजवण्यासाठी आलेल्या या दांपत्याचे विशेष स्वागतही करण्यात आले.