या ना त्या कारणाने बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वेठिस धरण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार सातत्याने करत असते त्यामुळे भीक नको पण कुत्र आवर म्हणायची वेळ बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर येऊन ठेपली आहे.
कर्नाटक सरकारने एक नवीन दंडक घातला आहे. त्यामुळे अग्निशामक दलाच्या परवानगीसाठी आता 5 हजार रुपये चलन म्हणून ठेवावे लागणार आहेत. या संबंधी राज्य सरकारने नवीन अध्यादेश काढला आहे.
बंगळूर येथे सध्या अग्निशामक दलाने या प्रकारे दंडक घातला आहे.सर्व गणेश मंडळा कडून पाच हजार रुपयांचे नॉन रिफंडेबल डिपॉजिट घेतलं जात आहे तोच फंडा आता बेळगावताही वापरण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी अग्निशामक दलाची परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी परवानगीचा 5 हजार रुपयांचे चलन भरावे लागणार आहे. हे चलन भरल्यानंतर ते मंडळांना परत देण्यात येणार नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. अचानक काढलेल्या या दंडकामुळे अनेक गणेशोत्सव मंडळातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या बेळगाव येथील काही अग्निशामक दलाचे अधिकारी बंगलोरला गेले आहेत. ते परत आल्यानंतरच बेळगावातील मंडळा कडून हे चलन घ्यावे की नाही याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी अग्निशामक दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून मंगळवारी चर्चा करणार आहेत. याबाबत बेळगावात अशा प्रकारचा दंडक घालू नये, अशी मागणीही करणार आहेत. मात्र कर्नाटक सरकारचा हा निर्णय अनेक मंडळाची डोकेदुखी वाढविणारा ठरणार आहे.
एकीकडे तत्कालीन कर्नाटक सरकारने पाच वर्षांपूर्वी बेळगावातील गणेश उत्सवास एक कोटी निधी मंजूर केला होता मात्र आताच्या सरकारकडून निधी देण्या एवजी मंडळा कडूनच निधी काढून घेण्याच्या योजना आखल्या जात आहेत.विघ्न हर्त्या गणपती बाप्पा ला हे कानडी सरकारचं नवीन विघ्न समोर आलं आहे.