ता प मध्ये सत्ता आणण्यासाठी समिती सदस्यांनी पुढाकार घ्यावा!
तालुका पंचायतीचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांच्या मनमानी कारभाराला नाराजीची किनार लागली आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्ष पदावरून हलविण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य सुनील अष्टेकर रिंगणात उतरणार आहेत. मात्र काही राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्या समिती सदस्यांमुळे पुन्हा तालुका पंचायत वरील भगवा झेंडा फडकविण्यास अडथळा निर्माण होत आहे.
समांतर अनुदान वाटपावरून तालुका पंचायतीचे अध्यक्ष शंकरगौडा यांच्यावर नाराजी आहे. त्यामुळे त्यांना हटविण्यासाठी भाजप, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि काँग्रेस मधील काही नाराज असलेल्या सदस्यांनी जोरदार तयारी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे समितीचा अध्यक्ष होण्यास पोषक वातावरण आहे. मात्र काही समिती सदस्यच माघार घेत असून तालुका पंचायत वर भगवा फडकविण्याच्या कामात आड येत आहेत आणि चालढकल करत आहेत. यावेळी तरी सर्वांनि एकजूट होऊन गेलेला गड परत आणावा अशी मागणी होत आहे.
सुनील अष्टेकर यांनी समिती सदस्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्या समिती सदस्यांनी याकडे दुर्लक्ष करून पुन्हा राष्ट्रीय पक्षांकडेच सत्ता देण्याचा घाट घातला आहे का? असा प्रश्न पडला आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या काँग्रेसमध्ये २३ सदस्य आहेत. त्यामधील काही नाराज सदस्य व भाजपमधील सर्व सदस्य समितीला पाठिंबा देण्यास तयार आहेत. त्यामुळे अध्यक्ष समितीचा तर उपाध्यक्ष काँग्रेसचा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र काँग्रेस मधील काही मराठी सदस्य सुनील अष्टेकर यांना पाठिंबा देण्यास तयार आहेत. त्यामुळे समितीचा झेंडा पुन्हा एकदा तालुका पंचायतीवर फडकू शकतो. यासाठी राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला न राहता समितीचा झेंडा फडकविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
मराठी माणूस पुढे जात असल्यास त्याचे पाय ओढण्याचे काम मराठी माणूसच करत असतो, पण तसे न करता समितीची सत्ता यावी यादृष्टीने विचार होण्याची गरज आहे. सर्व मराठी सदस्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.