शिक्षक आपल्या जीवनात महत्वाची शिकवण देत आले आहेत. शिक्षकांमुळेच सरळ वाट दिसते आणि माणूस ज्ञान आत्मसात करून घेऊन शहाणा होतो. यासाठी शिक्षकासमोर नतमस्तक होण्याचा दिवस म्हणून शिक्षक दिन ओळखला जातो. या शिक्षक दिनी बेळगाव शहर आणि परिसरातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना वंदन केले.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा किंवा हॅपी टीचर्स डे अश्या शब्दात आपल्या सर मॅडम आणि गुरुजींना शुभेच्छा देण्यात आल्या. आज सकाळपासूनच प्रत्येक शाळेमध्ये विध्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटवस्तू किंव्हा फुल देऊन शुभेच्छा देतच होते.
शाळा आणि भागात आज दिवसभर फुल विक्रेते उपस्थित होते. विद्यार्थी ही फुले खरेदी करून आपल्या शिक्षकांना देत होते. त्यांच्या पायावर डोके टेकवून नमस्कार करीत होते.
बाजारातून शिक्षक दिनाची खास ग्रीटिंग कार्डे आणून शिक्षक वर्गाला देण्यात आली. ,तर काही विद्यार्थ्यांनी स्वतःच कार्डशीट पेपर आणून आपल्याला हवी त्याप्रमाणे ग्रीटिंग कार्डे बनऊन शिक्षकांना दिली.
काही माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांना काही तास विश्रांती देण्यात आली होती. शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. आठवी, नववी आणि दहावीची मुले आपण शिक्षक होऊन खालच्या वर्गांना शिकवत होती. यामुळे शिक्षकांना शाळेत शिकवताना काय त्रास भोगावे लागतात याचा अनुभवही या विद्यार्थ्यांना आला.
शिक्षक हे आदराचे स्थान आहे, या आदराच्या पदाला वंदन करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठीचा हा दिवस उत्साहात साजरा केला.