बेळगाव शहरातील रस्त्यांच्या अवस्थेबद्दल शहरातील नागरिक आरोप करत असताना हेस्कोम परत परत खोदून या रस्त्यांची आणखी वाट लावत आहे.
बेळगाव मनपाकडून परवानगी न घेता केबल घालण्यासाठी रस्त्यांची खुदाई सुरू आहे. बेळगाव मनपाने याबद्दल कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या शहरातील सारेच रस्ते वाईट परिस्थितीत आहेत. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे इतके खड्डे पडले आहेत. पावसाने रस्त्यांची अवस्था अधिक घातक बनवली आहे.पावसाने भरलेल्या खड्ड्यांची खोली नेमकी किती आहे हे ओळखणे सुद्धा कठीण आहे.
अशा काळात हेस्कोमने जास्तच वाईट स्थिती निर्माण केली आहे.या स्थितीला आता शांत राहून चालणार नाही, हेस्कोमने असेच सुरू ठेवल्यास कारवाई करू असा इशारा मनपाने दिला आहे.
मनपाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते व्ही एस हिरेमठ यांनी हेस्कोम चे अधिकारी पावर केबल घालण्यासाठी सगळीकडे खुदाई करत आहेत. पण काम झाल्यावर ते खोदलेले खड्डे बंद करत नाहीत.यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
गणेश चतूर्थी तोंडावर आहे. हा सण येण्यापूर्वी सर्व खोदलेले खड्डे भरून घ्या अशी सूचना करण्यात आली आहे, पण तसे न झाल्यास आवश्यक कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.