गणेश चतुर्थी म्हणजेच गणेशाचे पूजन करण्याचा दिवस आहे १३ सप्टेंबर. गणपतीच्या आगमनाला फक्त २३ दिवस शिल्लक आहेत. सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींचे बुकिंग झाले आहे आणि मूर्तिकार युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ऐनवेळी पीओपी च्या मूर्ती जप्त करायचा निर्णय पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यानी संयुक्तपणे दिला आहे.
ही घोषणा उत्सवाला कमी दिवस असताना कितपत योग्य ठरेल? सामाजिक पातळीवर असंतोष निर्माण होईल का? मूर्ती जप्त केल्यावर प्रशासन नवीन पर्यावरण स्नेही मूर्ती कुठून आणून देणार? असे काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून न्यायालयाने हा आदेश दिला पण स्थानिक पातळीवरील परिस्थितीचे भान प्रशासनाने ओळखायला नको आहे काय? नदी, नाले किंव्हा वाहत्या पाण्यात विसर्जन होत असेल तर हा निर्णय योग्य आहे, पण बेळगाव मध्ये खास तीन ते चार विसर्जन तलाव निर्माण करून विसर्जन होत असताना मूर्ती जप्त करण्याचा निर्णय कितपत योग्य ठरेल हा प्रश्न आहे. ऐनवेळी गणेशभक्त आणि मूर्तिकारांना वेठीस धरण्याचा हा निर्णय उत्सवाच्या तोंडावर अकारण असंतोष निर्माण करेल असे मत आहे.
लगेचच आज म्हणजे बुधवार पासून कारवाई करू असे या दोन्ही अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शहरात गोंधळ माजेल, विरोध होईल, तरीही मूर्ती जप्त झाल्याच तर मूर्तिकार आणि गणेशभक्तांच्या नुकसानीचा प्रश्नही आहे. जर का प्रशासन कठोर वागले तर भावना दुखावल्या जाणार आहेत आणि उरलेल्या काळात नवीन मूर्ती आणणार कुठुन हा प्रश्नही आहे.
मागील वर्षी मूर्तिकार आणि गणेश भक्तांनी आंदोलन करून विरोध केला तेंव्हा यावर्षी चालवून घेऊ पुढील वर्षी मातीच्याच मूर्ती करा असे सांगितले होते. पण पूर्णपणे मूर्ती मातीपासून बनवणे कठीण आहे ही मूर्तिकारांची तांत्रिक अडचण आहे, काही प्रमाणात तरी प्लास्टर चा वापर केला नाही तर मूर्ती बनू शकत नाही.
मिरवणूक, दहा दिवस पूजा आणि विसर्जन या काळात मूर्ती टिकायची असेल तर ती पीओपी पासूनच तयार करावी लागते पण प्रशासन आपला निर्णय जाहीर करून बसले आहे. आता गणपतीच्या तोंडावर उगीचच सामाजिक वातावरण बिघडले गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल हे माहीत नाही.
असे निर्णय होऊ नव्हे म्हणून स्थानिक राजकारण्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते. आता आंदोलन झाले तर ते आंदोलनात पुढे होतील, पण भाविकांच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या प्रशासनाला ताब्यात ठेवणे त्यांना जमलेले नाही. आता आंदोलनाचे निर्णय घेऊन गोंधळ घालण्यात राजकारणी आपली पोळी भाजून घेतील. तेंव्हा शांतपणे या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे आव्हान बेळगाव चे गणेशभक्त आणि मूर्तिकारांसमोर आहे.