शंभर दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यावर कोणत्याही आव्हानाला तोंड द्यायला मनाची तयारी होते.बिग बॉसमध्ये आम्ही प्रवेश केल्यावर दोन गट झाले होते.सिनियर मंडळी होती त्यांचे वागणे माज आल्यासारखे होते.शंभर दिवसात बाहेरच्या जगाचा कोणताही संपर्क नसतो.फोन वापरायचा नाही.पेपर नाही,टीव्ही नाही अशी सगळी बंधने होती.
बिग बॉस केल्यानंतर अनेक सिनेमा सिरीयल मध्ये ऑफर यायला लागलेत अशी माहिती बिग बॉस मराठीच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या नवोदित अभिनेत्री सई लोकूर हिने बेळगावात पत्रकार परिषदेत दिली.
मी सध्या इंटिरियर डिझाइनरचे शिक्षण घेत असल्यामुळे शंभर दिवस कॉलेज चुकवण्यासाठी व्यवस्थापन परवानगी देईल कि नाही याविषयी मी साशंक होते.पण कॉलेजमध्ये बोलल्यावर बिग बॉसमध्ये तू जातीस हे कौतुकास्पद आणि आम्हालाही अभिमानास्पद आहे असे व्यवस्थापनाने सांगून परवानगी दिली.बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी सगळ्या तर्हेच्या वैद्यकीय तपासण्या केल्या गेल्या.अगदी मानसोपचार तज्ज्ञांशी देखील संवाद साधून आमची मानसिक क्षमता तपासली गेली.
शंभर दिवसांच्या कालावधीत अनेक कसोटीचे प्रसंग आले पण मी त्यांना खंबीरपणे तोंड दिले.एकदा पडल्यामुळे पाय दुखावला होता, वेदना होत होत्या पण उपचार घेऊन पाय दुखत असताना देखील मी मला दिलेल्या टास्क पूर्ण केल्या.एकदा आई भेटायला आली होती पण मला न भेटत इतर स्पर्धकांना भेटून ती निघून गेली त्यामुळे मी खूप निराश आणि संतापले होते.आदळआपट देखील केली पण काही वेळाने मला आई येऊन भेटली तेव्हा कळले की तो देखील बिग बॉसचा एक ट्विस्ट होता.
बेळगावच्या जनतेने देखील मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी बेळगावच्या जनतेचे आभार मानते.पत्रकार परिषदेला वीणा लोकूर उपस्थित होत्या.