आजूबाजूला शेती जमीन, पावसाळ्यात घरात शिरणारी गार हवा…घरासमोर तळे सदृश स्थिती…. आणि चिखलाचे साम्राज्य यामुळे समर्थनगरातली अनेक कुटुंब घर सोडून शहरात राहायला गेलेत तर काही जण या मोसमात घर सोडण्याच्या तयारीत आहेत अशी अवस्था आहे स्मार्ट बेळगावमधल्या या उपनगराची….बेळगाव live ने मंगळवारी या भागाची पाहणी केली .तेंव्हा हा भाग म्हणजे नागरी वस्ती नसून हे बेळगाव उत्तर भागातील एक बेट असेच जाणवत आहे.समर्थनगरातील अनेक भाग बेट सदृश बनला आहे. जिकडे तिकडे तळी साचली आहेत. मात्र या भागाला कुणी वाली नाही या भागातून वाहणारा लेंडी नाला फुटून व मेन ड्रेनेज लाईन खाली गेल्यामुळे नाल्याचे पाणी अनेक घरात शिरलंय त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांची दैना उडाली आहे. पालिकेने तसेच लोकप्रतिनिधीनी समर्थ नगरच्या समस्या सोडवाव्यात नाही तर पावसाळ्यात इथे जलतरण स्पर्धा भरवाव्यात असे आवाहन एकदंत युवक मंडळाने केले आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी येथे नालेसफाई केली जाते पण ह्या वर्षी अधिकाऱ्यांना सांगून देखील दुर्लक्ष करण्यात आले याचा परिणाम समर्थ नगर वासीयांना आता भोगावा लागत आहे.गेल्या दोन दिवसापासून रात्रभर घरामध्ये साचलेलं पाणी काढण्याचे काम समर्थ नगर मधील नागरिक करत आहे या सगळ्या समस्या मूळे शहरातून समर्थ नगरात लहान मुलांना ये जा करणं मुश्किल झालं आहे.
समर्थनगर येथील नागरिक नेहमीच मूलभूत समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आक्रमक असतात मात्र शासन दरबारी त्यांच्यावर अन्यायच झालाय. असं उपनगराकडे दुर्लक्ष केल्यास शहर स्मार्ट होणार का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या पावसाळ्यात तर समर्थनगरचे बेट बनले आहेत त्यामुळं स्थानिक नगरसेवक पालिका अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जात आहे.नवनियुक्त लोक प्रतिनिधींनी केवळ पाहणीच न करता आपलं वजन वापरून ठोस कृतिशील पावले उचलावी अशी देखील मागणी केली जात आहे.
सध्या लहान मुलांची मात्र मागणी पावसाने पूर्ण केली आहे. पावसाळ्यात शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय अशी मागणी मुले भोलानाथकडे करतात. त्यांना घराभोवती तळे साचून सुट्टी मिळाली आहे. ही मनपा ची त्यांच्यावर कृपाच झाली आहे.