बेळगाव शहरात रिक्षाने प्रवास करणे म्हणजे साहसी प्रवास ठरत आहे. हात करून रिक्षा थांबवण्यापासूनच या साहसी प्रवासाला सुरुवात होत आहे. रिक्षा थांबवली की चालकरूपी देवाकडून जी रक्कम सांगितली जाईल ती देण्याच्या पलीकडे ग्राहकांच्या हातात काहीच उरत नाही अशी परिस्थिती आहे.
बेळगावमध्ये ओला रिक्षा सुरू आहे पण तिचा प्रभाव अजून तितका पडलेला नाही.फक्त ऑनलाईन ऍप वर बुकिंग असल्याने सामान्य नागरिकांमध्ये ही व्यवस्था अजून रुळलेली नाही.
नागरिकांना रिक्षा चालकांशी वाद घालायचा नाही, प्रवास दर निश्चित करण्यावरून भांडणे करायची नाहीत. आजकाल फक्त एक किलोमीटर अंतरासाठीही रिक्षाचालक ४० रुपये मागत आहेत आणि दोन अडीज किमीसाठी ९० रुपये. आणि तुम्ही बाहेरून आलेले असाल तर प्रवास कितीही किमीचा असो १०० रुपये घेणे नक्की आहे, म्हणून लोक त्रासात आहेत.
पोलीस आणि आरटीओ नी रिक्षाचे दर निश्चित करण्यावर कधीच लक्ष केंद्रित केलेलं नाही. उलट ओला कॅब चालकांचीच छळवणूक सुरू आहे. आता ओला च्या मागोमाग उबेर आणि मेरू सारखे कॅब बेळगाव मध्ये आले पाहिजेत. तरच बेळगाव मधील ऑटोक्रसी सम्पूष्टात येऊ शकेल.
आणखी एकच अपेक्षा आहे की पोलिसही जरा नागरिकांच्या भल्याचा विचार करू लागतील आणि नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या लोकांपेक्षा नागरिकांशी प्रामाणिक व्यवहार करणाऱ्यांना साथ देतील.